१०वी आणि १२वी चे निकाल नुकतेच लागले आणि पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांना पडला. बऱ्याच जणांचे फोन आले. या सगळ्यात एक खटकणारा प्रश्न विचारला जात होता. माझ्या मुलाला/मुलीला स्पर्धा परीक्षा करायची आहे मग कोणत्या शाखेला प्रवेश घेणे योग्य राहील? स्पर्धा परीक्षेसाठी आत्तापासून काय तयारी करावी लागेल? खरे तर या गोष्टी ज्याच्या त्याने ठरवायच्या. पण याबाबतीतील गोष्टींबाबत माझी काही मते आहेत, त्यांचा केलेला हा उहापोह.
विद्यार्थ्यांची स्वतः निर्णय घेण्यास असमर्थता
सर्वात अगोदर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे १०वी १२वी च्या फार कमी मुलांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याइतके ज्ञान किंवा अनुभव असतो. त्यामुळे यावेळचे निर्णय बऱ्याचदा पालकांनी घेतलेले किंवा ऐकीव गोष्टींवरून घेतलेले असतात. त्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वेगळी आवड निर्माण होऊ शकते. अशावेळी अपुऱ्या माहितीवर अगोदर घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. अशावेळी सर्व क्षेत्रातील स्पर्धेमुळे, होणाऱ्या खर्चामुळे आणि जाणाऱ्या वेळेमुळे निर्णय बदलनेही अवघड जाते. तसेच या फिल्ड मध्ये खूप जास्त वेळ आणि बाकी सर्व जवळपास सोडून देऊन अभ्यास करावा लागतो. यासाठी विद्यार्थ्यांना मुळात या क्षेत्राची आवड हवी. तसे नसेल तर पालकांनी निर्णय घेऊन मुलास या क्षेत्रात टाकले असेल तर त्यास अभ्यास अवघड जातोच पण तणाव देखील लवकर येऊ शकतो. म्हणून मुलांना स्वतः निर्णय घेता येत नाही तोपर्यंत या क्षेत्रात त्यांना ढकलू नये.
अभ्यास खूप लवकर सुरु करणे कसे फारसे उपयोगाचे नाही
त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे १०वी १२वी नंतर स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करावा की नाही. स्पर्धा परीक्षा या खूप जास्त डायनॅमिक असतात. दर २-४ वर्षात या परीक्षांच्या पॅटर्न मध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये बराच फरक पडतो. तसेच चालू घडामोडी हा स्पर्धापरिक्षांचा गाभा असतो. त्यामुळे जेंव्हा परीक्षा देणार तेंव्हाचा अभ्यास जास्त महत्वाचा असतो. २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि पदवीच्या शेवटच्या वर्षी असल्याशिवाय स्पर्धा परीक्षा देता येत नाही. त्यामुळे फार अगोदर अभ्यास करून फार फायदा होतो असे नाही.
याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात त्याच त्याच गोष्टींचे पुन्हा पुन्हा वाचन आणि उजळणी करावी लागते. त्यामुळे त्याच गोष्टींचा कंटाळा येणे ही स्वाभाविक समस्या आहे. त्यामुळे खूप अगोदर अभ्यास सुरु केला तर नेमके परीक्षा देण्याची वेळ येते तेंव्हा अभ्यासाचा कंटाळा येण्याची आणि ही सगळी प्रोसेस त्रासदायक वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पदवीच्या शेवटच्या वर्षात अभ्यास सुरु करणे उत्तम. हवे तर त्या अगोदर काही दिवस परिक्षांबद्दल माहिती गोळा करणे वगैरे गोष्टी केल्या तरी चालेल पान फार अगोदर अभ्यास नकोच.
अनिश्चितता, पदवीचे महत्व आणि Back-ups
तसेच स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र अतिशय अनिश्चित स्वरूपाचे आहे. यामध्ये अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टींनी फरक पडतो. त्यामुळे कोणीही 100% सांगू शकत नाही की तो पास होणारच. त्यात दिवसेंदिवस या क्षेत्रातील स्पर्धा वाढतच आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे येताना back-up plan असणे मला तरी आवश्यक वाटते. जर तीन चार वर्षे देऊनही मनासारखे काही नाही झाले तरी यातून बाहेर पडून देखील चांगले करिअर करता येईल अशी आपली शैक्षणिक पार्श्वभूमी असायला हवी. १०वी , १२ वी पासूनच या क्षेत्राकडे जास्त लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांचे पदवीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पदवीचा अभ्यास कमकुवत राहतो आणि त्यात करिअर करायची वेळ आली तर अडचणी येतात. तसेच जर पदवीच्या वेळी अभ्यास चांगला केला तर अभ्यासाची सवय लागते, गोष्टींची समज वाढते. याचा पुढे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात फायदाच होतो.
पदवी आणि स्पर्धा परीक्षा परस्परसंबंध
आणखी एक बाब जी वारंवार विचारली जाते ती म्हणजे पुढे जाऊन स्पर्धा परीक्षाच द्यायच्या आहेत तर कोणती पदवी करावी. पूर्वी कृषी शाखा आणि MPSC यांचा अभ्यासक्रम मिळताजुळता असल्याने त्या पदवीचे जास्त विद्यार्थी यशस्वी व्हायचे. तसेच कला शाखेचे जास्त विद्यार्थी UPSC मध्ये यशस्वी व्हायचे. पण अलीकडे सर्वच गोष्टीत बदल झाला आहे. आता जो अभ्यासक्रम आहे त्यात कोणत्या एका पदवीला कसलाही advantage मिळत नाही. आता बहुतांश विद्यार्थी engineering कडे वळतात आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेत पण मग साहजिकच तेच जास्त दिसतात. जर व्यवस्थित अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही कोणती पदवी केलीय याचा कसलाही फायदा किंवा तोटा स्पर्धा परीक्षेत होत नाही. त्यामुळे कोणत्या पदवीला जायचं हे ठरवताना आवड आणि पुढे करिअर च्या संधी यावर भर द्यावा. ते ठरवताना पुढे स्पर्धापरिक्षा करायची याचा जास्त विचार न केलेलाच बरा असे मला वाटते.
क्लास लावावा का?
शेवटचा पण सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे १०वी किंवा १२ वी नंतर क्लास लावावा का? याचे मात्र माझे उत्तर सरळ नाही असे असेल. एकतर या काळात कॉलेज आणि त्याचा अभ्यास हाच खूप असतो. तसेच या वयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. अशावेळी त्यांना कॉलेज व पदवीचा अभ्यास आणि स्पर्धापरिक्षेचा क्लास या दुहेरी कात्रीत टाकल्यास अतिताणाने किंवा अतिव्यस्तपणामुळे व्यक्तिमत्व विकास हवा तेवढा होत नाही. तसेच क्लास लावूनही अभ्यास तेवढा करणे न जमल्याने क्लास जवळपास वायाच जातो. क्लास मध्ये शिकवतील त्यापेक्षा जास्त अभ्यास घरी केला तरच क्लास चा फायदा होतो आणि या वयात ते शक्य नसते. आणि मुलांवर पडणार ताण पाहता त्यांना क्लास च्या फंदात न पाडणेच बरे.
वर म्हणल्याप्रमाणे हे सर्व ज्याचे त्याचे प्रश्न असतात. यात black-white काही नसते. पण यात माझी जी मते आहेत ती सांगितली. याची जास्तीत जास्त लोकांना निर्णय घेण्यास मदत व्हावी हीच अपेक्षा.
– अमोल मांडवे, ACP/DYSP
Other important articles for MPSC Rajyaseva 2020 Preparation:
1. How to prepare for MPSC Rajyaseva Preliminary Exam
2. Prepration for Rajyaseva Interview – Vishal Naikwade
3. Rajyaseva Prelims Book List By Dattatray Bhise sir