Current Affairs 04 March 2020
अजयभूषण पांडे केंद्रात नवे अर्थसचिव

केंद्र सरकारने अजयभूषण पांडे यांना नवे अर्थसचिव म्हणून नियुक्त केले आहे. सध्या ते महसूल विभागाचे सचिव आहेत. महाराष्ट्र केडरच्या १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले पांडेंनी यूआयडीआएचे सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
उपाययोजना दलात सीमा वर्मा यांचा समावेश

भारतीय -अमेरिकी आरोग्य धोरण सल्लागार सीमा वर्मा यांना अमेरिकेत करोना विषाणूचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या व्हाइट हाऊस करोनाविषाणू कामगिरी दलात प्रमुख सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी हे पथक ३० जानेवारीला स्थापन केले.
चीनमध्ये करोनाचा प्रसार वेगाने सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्याची दखल घेऊन वेळीच त्याचा अमेरिकेत प्रवेश मर्यादित ठेवण्यासाठी, तसेच संसर्ग सुरू झाला तर उपाययोजना करण्यासाठी पथक स्थापन केले होते.
आरोग्य व मानवी सेवा मंत्री अॅलेक्स अझार हे या पथकाचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय सुरक्षा मंडळा समवेतही त्यांचा समन्वय आहे.
सीमा वर्मा यांची नेमणूक सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सव्र्हिसेसच्या प्रशासक म्हणून करण्यात आली आहे. ‘ज्येष्ठ कामकाज’ मंत्री रॉबर्ट विल्की यांचीही नेमणूक त्यात करण्यात आली आहे.
अमेरिकेत करोना विषाणूचा प्रसार टाळणे आणि जे रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करणे याला प्राधान्य देण्यात येत आहे. रुग्णांना सुरक्षित ठेवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्यात येत आहेत.
‘परळ-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा : सुशील मुरकर ‘परळ-श्री’चा मानकरी

स्वामी समर्थ व्यायामशाळेच्या सुशील मुरकरने मनीष आडविलकर्स ‘परळ-श्री’ किताब पटकावला. त्याने दीपक तांबीटकर, गणेश पेडामकर यांच्यावर मात करीत रॉयल एनफिल्ड पटकावली. बाल मित्र जिमचा शुभम कांडू फिजिक स्पोर्ट्स गटात विजेता ठरला तर दिव्यांगाच्या गटात डी.एन. फिटनेसचा हितेश चव्हाण अव्वल आला.
१. सुशील मुरकर, २. दीपक तांबीटकर, ३. गणेश पेडामकर; फिजिक स्पोर्ट्स : १. शुभम कांडू, २. विजय हाप्पे, ३. अली अब्बास; दिव्यांग गट : १. हितेश चव्हाण, २. अक्षय शेजवळ, ३. प्रथमेश भोसले.
भारतातून औषधनिर्यात करण्यावर निर्बंध

करोना विषाणूचा जगभरातील प्रसार लक्षात घेता भारतात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, या उद्देशाने पॅरासिटामॉलसारख्या सर्वसाधारण औषधांच्या निर्यातीवर तात्काळ निर्बंध लादण्याचा निर्णय सरकारने घेतला. यात पॅरासिटामॉल आणि अन्य २५ औषधे तसेच त्यांच्या उपउत्पादनांचा समावेश आहे.
जागतिक पातळीवर अशा सर्वसाधारण (जेनेरिक) औषधांच्या निर्मितीमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे.
निर्यातीवर निर्बंध घातलेल्या या औषधांमध्ये ताप, वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे पॅरासिटामॉल, सर्वसाधारणपणे वापरले जाणारे प्रतिजैविक मेट्रोनिडाझोल, जिवाणू आणि इतर संसर्गावर वापरली जाणारी औषधे, तसेच जीवनसत्व ब-१, ब-२ घटकांचा समावेश आहे.
यासंबंधीचा आदेश परकीय व्यापार महासंचालकांनी जारी केला आहे. त्यानुसार, या २६ औषधांची निर्यात करायची असल्यास यापुढे उत्पादकांना परवाना घ्यावा लागणार आहे.
जगभरात पुरवल्या जाणाऱ्या सर्वसाधारण औषधांपैकी २० टक्के औषधे भारतात बनवली जातात.
भारतात औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या एकूण रासायनिक घटकांपैकी दोनतृतियांश मालाचा पुरवठा हा चीनद्वारे केला जातो. चीनमध्ये करोनामुळे हाहाकार उडाल्यानंतर तेथील रसायन निर्मात्यांकडून होणारा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे देशात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.
जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानी

भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. हॉकी प्रो-लिग स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर हॉकी संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे.
२००३ सालानंतर भारतीय हॉकी संघाची ही सर्वोत्तम झेप मानली जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१६ रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला मागे टाकत भारतीय हॉकी संघाने चौथं स्थान पटकावलं आहे.