⁠  ⁠

महाराष्ट्रात १३५१४ जागांची मेगाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

ग्रामविकास विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांवर ही मेगाभरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी तर होईलच, शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरतीबाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.

या पदांसाठी होणार मेगाभरती
ग्रामविकास विभागाच्या आस्था ८ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष ५० टक्के), आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.
ही मेगाभरती राज्यातील सहाही विभागांत होणार असून, सर्वाधिक जागा पुणे विभागात (२ हजार ७२१) आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात २ हजार ७१८ जागा आहेत. नाशिक विभागात २ हजार ५७४, कोकण विभागात २ हजार ५१, नागपूरमध्ये १ हजार ७२६ आणि अमरावती विभागात १ हजार ७२४ अशा एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार असून, तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे.

Share This Article