⁠  ⁠

MPSC राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर ; प्रमोद चौगुले राज्यात पहिला

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रमोद चौगुले हा 633 मार्कांसह राज्यात पहिला आला आहे, तर शुभम पाटीलला 616 मार्क मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली मेत्रे पहिली आहे, तर ओव्हरऑल सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

प्रमोद चौगुले राज्यसेवा 2021 च्या अंतिम निकालामध्ये राज्यात प्रथम आला आहे. 405 पदांसाठी परीक्षा दिनांक 7, 8, 9 मे 2022 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रमोद चौगुले हे 2020 च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आले होते, त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती.

नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू

सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी आंदोलन करीत होते. यासंदर्भात त्यांनी विविध बड्या राजकीय नेत्यांची भेट देखील घेतली होती. पण आता त्यांच्या मागणीला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू होणार आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

Share This Article