महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा जुलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे तयारीसाठी किमान सहा महिने उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन अर्हताप्राप्त उमेदवारांनी तयारी सुरू केली पाहिजे.
मागील लेखांमध्ये सामान्य अध्ययन घटकावर मागील प्रश्न पत्रिकांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या आधारे विचारात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात आली. या विश्लेषणाच्या आधारे सामान्य अध्ययनातील घटकांची तयारी कशी करावी याबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येईल. भारताचा इतिहास आणि सामाजिक सुधारणा या घटकांची तयारी समांतरपणे करणे शक्य आहे. त्याबाबत कसे धोरण असावे ते पाहू.
इतिहास
- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आधुनिक भारताचा इतिहास असे अभ्यासक्रमामध्ये नमूद केले आहे. सन १८५७ ते २००० पर्यंतचा कालखंडही नमूद केलेला आहे. त्यामुळे इतिहासाच्या पारंपरिक अभ्यासक्रमासह स्वातंत्र्योत्तर भारतातील सन २०००पर्यंतच्या ठळक घडामोडींचा आढावा आवश्यक आहे.
- सन १८५७ च्या उठावाचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल. कारणे/पार्श्वभूमी, स्वरूप / विस्तार / वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे आणि परीणाम. शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी/बंड यांचाही अभ्यास याच मुद्दय़ांच्या आधाराने करावा.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा. स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील मागण्या (तौलनिक पद्धतीने), दोन्ही कालखंडातील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय
- क्रांतिकारी चळवळींवरही प्रश्न विचारण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये उदयाची कारणे / पार्श्वभूमी, विचारसरणी, ठळक काय्रे, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र, संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे कार्य अशा मुद्यांचा समावेश करावा.
- गांधीयुगातील विविध चळवळी (असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ.) अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप आणि त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्यांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.
- स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास पार्श्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाईसरॉय, भारतमंत्री या मुद्यांच्या आधारे करावा.
- स्वातंत्र्योत्तर इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे.
- भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी अभ्यासताना आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, राष्ट्रीय गरज, कारणे, स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, मूल्यमापन हे मुद्दे पाहावेत. नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडावर भर देऊन दुसरी अणूचाचणी आणि ठरॅ कडून अणू इंधन पुरवठय़ासाठीच्या भारताच्या प्रयत्नांची वाटचाल लक्षात घ्यावी.
- भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारस व्यवस्थित समजून घ्याव्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचार प्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
- चीन, पाकिस्तानबरोबरची युद्धे, बांग्लादेश मुक्ती मोहीम, शेजारी देशांशी झालेले महत्वाचे सीमाविषयक करार, संयुक्त राष्ट्र संघटनेतील महत्वाच्या विषयांवरील भारताची भूमिका/ योगदान आणि आणीबाणीच्या कालखंडातील नेते, चळवळ यांचा आढावा घ्यावा.
महाराष्ट्राचे समाज सुधारक
- अभ्यासक्रमामध्ये केवळ महाराष्ट्रातील समाजसुधारक असा उल्लेख असल्याने देशातील सामाजिक सुधारणा चळवळींचा फक्त आढावा घ्यायला हवा. यावर प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यात येणार नसले तरी असा आढावा घेतल्याने महाराष्ट्राच्या सुधारणांची पार्श्वभूमी व देशातील सुधारणांमधील महाराष्ट्राचे योगदान व संबंध समजून येतो.
- सध्या तरी या घटकावर सुधारकांच्या संस्था आणि लेखनावर प्रश्न विचारण्यात आलेले दिसतात. मात्र अभ्यास करताना याबाबत जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान, महत्त्वाच्या घटना (कालानुक्रमे), काय्रे, असल्यास लोकापवाद,
- यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.