MPSC PSI STI ASO Pre 2020-Current Affairs
– फारुक नाईकवाडे
या लेखामध्ये दुय्यम सेवा पूर्व परीक्षा – चालू घडामोडी घटकाची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
चालू घडामोडी हा घटक पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात आधी नमूद करण्यात येतो. कारण सगळ्याच घटक विषयांचे पारंपरिक ज्ञान आणि विषयाची समज परीक्षेमध्ये तपासली जाणार असली तरी त्यापुढे जाऊन उमेदवारांना त्या त्या विषयाशी संबंधित अद्ययावत माहिती असणे आणि तिच्याबाबत त्यांनी जागरूक असणेही आयोगाला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने चालू घडामोडी हा घटक म्हटले तर वेगळा आणि म्हटले तर इतर घटक विषयांचा संदर्भ असा विचारात घेता येतो.
अनेक जागतिक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब ‘सामान्य अध्ययन’ प्रश्नपत्रिकेत उमटते. हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे. अभ्यास करताना पुढील उपघटक विचारात घेता येतील.
जागतिक चालू घडामोडी
* यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्तीविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.
* विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
* साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चच्रेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चच्रेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पाहाव्यात.
* चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.
* नैसर्गिक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक / खगोलशास्त्रीय / लक्षणीय पर्यावरणीय घटना यांबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.
* खगोलशास्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.
* महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदा त्यांमधील भारताची भूमिका, झालेले ठराव / निर्णय, व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यावा.
भारतातील चालू घडामोडी
* राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
* राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.
* महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.
* चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.
सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी.
* यामध्ये भारताचे द्वीपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राजयव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पाहायला हव्यात.
* नैसर्गिक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घटना, त्यांची वैशिष्टय़े समजून घ्यावीत.
* आर्थिक विकास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.
* विविध शासकीय योजना, त्यांच्या तरतुदी, लाभार्थी यांचा आढावा घ्यायला हवा.
राज्यातील चालू घडामोडी
* राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व प्रकल्प, राज्य शासनाचे महत्त्वाचे व चर्चेत असलेले निर्णय यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
* भाषा, साहित्य, पत्रकारिता, क्रीडा इत्यादी क्षेत्रांतील राज्यस्तरीय पुरस्कार आणि राज्य स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
* राज्यामध्ये आयोजित होणारी साहित्य संमेलने, चित्रपट महोत्सव इत्यादींचा आढावा घ्यायला हवा.
सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती
* खेळांचे नियम, लोकपरंपरा, सर्वात मोठे / लहान भौगोलिक क्षेत्र, शहरांची उपनावे, प्रसिद्ध व्यक्तींची अवतरणे अशासारखे मुद्दे विचारले जाऊ शकतात.
संदर्भ साहित्य
अभ्यासासाठी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरता प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक परीक्षार्थिनी जाणून घेणे आवश्यक आहे.
उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाची घडामोडींची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाईड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीचा स्रोत म्हणून एकाच संदर्भ पुस्तकाचा वापर करणे उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, अशा तऱ्हेने अभ्यास केल्यास आपण स्पध्रेत टिकणे कठीण आहे याची जाणीव होते. यासाठी इंग्रजी संदर्भ पुस्तके वापरणाऱ्या उमेदवारांनी इंडिया इयर बुक, आर्थिक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प यांची प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स पाहावीत. राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल मराठी व इंग्रजीतून उपलब्ध होतो. नव्या योजना, कायदे यांचा अभ्यास करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ आणि कायद्याची मूळ प्रत पाहावी.
Add