⁠  ⁠

राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थव्यवस्था घटकाची तयारी

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

राज्यसेवा पूर्व परीक्षा – पेपर क्र. 1 हा सामान्य अध्ययनाचा पेपर असून त्यामध्ये अर्थव्यवस्था हा घटक समाविष्ट होतो. अर्थव्यवस्था या घटकांतर्गत आर्थिक आणि सामाजिक विकास , शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता (Inclusiveness) सामाजिक सेवा धोरणे इत्यादी उपघटकांवर प्रश्न विचारले जातात.

# हे देखील वाचा: एमपीएससी (राज्यसेवा) परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी…

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात घेण्यासाठी आधीच्या प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करणे गरजेचे ठरते.आर्थिक आणि सामाजिक विकासाशी निगडित विविध संकल्पना, निर्देशांक, राष्ट्राय आणि आंतरराष्ट्राय स्तरावरील आर्थिक आणि सामाजिक विकास मूल्यमापनाच्या विविध पद्धती आणि सद्य:स्थितीमध्ये त्यामध्ये होत असलेल्या विविध बदलांचा वेध घेणे महत्त्वपूर्ण ठरते.या घटकामध्ये लोकसंख्या अभ्यास हा उपघटक समाविष्ट असून त्यासाठी भारताचा जनगणना अहवाल अभ्यासणे गरजेचे ठरते. अर्थातच, भारताचा जनगणना अहवाल अभ्यासताना महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह अभ्यासावा लागतो – उदा. स्त्री-पुरुष प्रमाण, लोकसंख्या वाढ, साक्षरता, स्त्री-पुरुष साक्षरता प्रमाण, जननदर, मृत्यूदर, आयुर्मान यासारख्या वैशिष्ट्याबरोबरच त्या वैशिष्ट्यांचा कल अभ्यासणे आवश्यक आहे. यासारखी माहिती censusindia.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच, अर्थशास्त्राच्या एनसीईआरटीच्या अकरावीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये देखील यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे.

# हे देखील वाचा: ‘चालू घडामोडीं’चा अभ्यास कसा कराल?

जनगणना अहवालाचा अभ्यास करताना मागील जनगणना अहवालांचा तुलनात्मक कल अभ्यासावा लागतो. तसेच, ही सर्व माहिती महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यासावी लागते. तसेच, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, लोकसांख्यिकी लाभांश, राष्ट्राय लोकसंख्या धोरण – 2000 या बाबींचा अधिक नेमकेपणाने आणि परीक्षाभिमुख अभ्यास उपयुक्त ठरेल.आर्थिक आणि सामाजिक विकासाचे निर्देशांक या उपघटकाची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे अर्थशास्त्राचे पुस्तक, NCERT चे अकरावीचे अर्थशास्त्राचे पुस्तक, भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामधील HUMAN DEVELOPMENT हा घटक, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची (UNDP) वेबसाइट ह्यांचा अभ्यास करावा लागतो. मागील प्रश्नपत्रिकांच्या आकलनावरून या सर्व स्रोतांचे उपयोजन करावे लागते. मुद्देसूद टिपणांच्या साहाय्याने परीक्षाभिमुख तयारी करता येते. तुलनात्मक अभ्यासासाठी स्वत: तयार केलेले चार्ट्स उपयुक्त ठरतात. तसेच अद्ययावत संदर्भासाठी वृत्तपत्रे आणि वेबसाइटची मदत होते.आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास आणि शाश्वत विकास या संकल्पनांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये नेमका फरक कोणता आहे? आणि त्याचा परस्परसंबंध काय आहे? याचा नेमका अभ्यास ‘वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या स्वरूपाच्या अनुषंगाने केला तर निश्चितच फायदेशीर ठरेल.’ मानव विकास आणि शाश्वत विकासासंदर्भातील सद्य:स्थितीतील कल अभ्यासणे गरजेचे आहे. ग्रीन जीडीपी, हरित कर प्रणाली Green Taxation यासारख्या संकल्पना आत्मसात कराव्या लागतात. भारताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शाश्वत विकास आणि हवामान बदल हा घटक त्यादृष्टीने माहिती देण्यात आली आहे. वृत्तपत्रामध्येदेखील यासंदर्भात विविध स्वरूपाची माहिती उपलब्ध होते. दारिद्र्य आणि सर्वसमावेशकता या उपघटकांचा तयारीसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे अकरावीचे अर्थशास्त्राचे पुस्तक आणि नियोजन आयोगाचा अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करावा लागतो. तसेच, सद्य:स्थितीच्या संदर्भासाठी भारताचा आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल उपयुक्त ठरतो. दारिद्र्याशी निगडित विविध संकल्पना, दारिद्र्यरेषा ठरवण्यासंदर्भातील विविध समित्यांचे अहवाल, जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्राय संस्थांचे त्यासंदर्भातील निकष आणि उद्दिष्टे यांचे नेमके परीक्षाभिमुख आकलन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची नेमकी तयारी करावी लागते. त्यासाठी शासनाच्या त्यासंदर्भातील विविध विभागांच्या वेबसाइटचा आधार घेतल्यास अभ्यासाची अचूकता, अद्ययावतता आणि नेमकेपणा वाढण्यास मदत होते. तसेच, केंद्र आणि राज्य शासनाच्या अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकीय संकल्पना याचा नेमका अभ्यास उपयुक्त ठरतो. म्हणजेच, अर्थव्यवस्था या घटकाच्या तयारीसाठी महत्त्वाच्या स्रोतांबरोबरच, अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात घेऊन केलेली नेमकी तयारी निश्चितच फायदेशीर ठरेल.

(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कैलास भालेकर [email protected] यांचा हा लेख दैनिक दिव्य-मराठीमध्ये याआधी प्रसिद्ध झाला आहे.)

Share This Article