⁠  ⁠

सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं!

Mission MPSC
By Mission MPSC 4 Min Read
4 Min Read

दिनांक 5 एप्रिल 2016. राज्यसेवेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यात झळकलेल्या एका नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अगदी हे नाव आलेल्या व्यक्तीच्यासुद्धा.

प्रियांका ढोले-तहसीलदार, असं हे नाव.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील तहसीलदार हे एक महत्त्वाचे पद यांच्या नावापुढे कायमचे चिकटले. एक रंजक कथाच आहे ही. या मूळच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या कळंबी या गावच्या. सन 2010 या वर्षी इंजिनीयरिंग झालेलं. लगेचच स्पर्धा परिक्षांकडे मोर्चा वळविला. तेंव्हापासून 2016 पर्यंत UPSC च्या तीन तर MPSC च्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या. दरम्यानच्या काळात विक्रीकर निरीक्षक (STI) हे पद मिळाले, त्यामुळे सध्या मुंबईत कार्यरत. गेल्यावर्षी Dy.SP चे पद केवळ एका गुणाने गेले.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनिश्चितता परत अनुभवास आली.

आता खरी कथा येथून सुरु होते.

या NT(D) या प्रवर्गात मोडतात. 2015 यावर्षीच्या पूर्वपरीक्षेत या प्रवर्गातील मुलींसाठी वर्ग 1 ची एकही जागा नसल्यामुळे यातील अनेक मुलींनी खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल केले. यांनी मात्र अनवधानाने/चुकीने NT(D) मध्ये अर्ज भरला.

जेंव्हा वर्ग 1 ची एकही जागा नाही हे लक्षात आले तेंव्हा काय करावं काही सुचत नव्हतं. डोकं धरून बसण्याची वेळ आली.आयोगाच्या नियमानुसार पूर्व परीक्षेच्या फॉर्ममध्ये नंतर बदल करता येत नाही. तरीही यांनी थेट आयोगाचे कार्यालय गाठले. स्वतःला खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये टाकण्यासाठी आयोगाकडे अनेक अर्ज विनंत्या केल्या, एवढेच नव्हे तर आयोगात माहिती अधिकारही (RTI) वापरले. पण या सगळ्या धावपळीचा काहीच फायदा झाला नाही. नियमानुसार वर्गवारीत बदल करण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला.

वर्ग 1 च्या एकही जागेसाठी आपण पात्र नाही म्हणून अभ्यासातील सगळा मूडच गेला. परिणामी पूर्व परीक्षा सहज पास होऊनही एक औपचारिकता म्हणून दिलेल्या मुख्य परीक्षेत 600 गुणांपैकी केवळ 170 गुण आले. हा प्रयत्न व्यर्थ जाणार हे स्पष्ट झाले.
दरम्यानच्या काळात एक नाट्यमय घटना घडली…..

या प्रवर्गातील मुलांसाठी असलेले “तहसीलदार” हे पद मुलींसाठी वर्ग करण्यात आले. म्हणजे मुलींसाठी तहसीलदार हे पद देण्यात आले. यांच्यापैकी यांच्या प्रवर्गात 35 आणि 50 गुण जास्त असलेल्या काही मुली होत्या, पण त्यांनी खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये अर्ज भरल्यामुळे या प्रवर्गातील तहसीलदार या पदासाठी या मुली पात्र नव्हत्या. या काळात “द युनिक अकॅडमी”त आम्ही सुरु केलेल्या Interview Group ला प्रवेश मिळावा म्हणून यांनी माझी भेट घेतली. यावेळी मी यांना दोन प्रश्न विचारले…

1) तुमचा score किती?
2)तुमच्या ओळखीतील, तुमच्या प्रवर्गातील मुलींचे score किती?

यावेळी एक बाब लक्षात आली की यांच्यापेक्षा अनेक जास्त score असले तरी त्या बहुतांशी मुलींनी वर्ग 1 ची जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला होता. म्हणून त्या मुली या नवीन समाविष्ट पदासाठी पात्र नव्हत्या.
म्हणजेच…

नवीन समाविष्ट झालेले तहसीलदार हे पद यांना मिळेल याची निदान मला तरी खात्री झाली होती. परिणामी 100 गुणांच्या मुलाखतीवर आम्ही खूपच लक्ष दिले. कसून सर्व केला, काहीही मागे ठेवले नाही, मुलाखतीच्या सर्व सत्रांसाठी या दर आठवड्याला मुंबईहून यायच्या.ऑफिस सुटले कि केवळ 4 तासात पुण्यात Interview Group ला हजर.कितीही धावपळ झाली तरी नक्की येणारच. साधारणतः चार महिने हि धावपळ चालू होती. छोट्या छोट्या उणिवा शोधून आम्ही त्या दूर केल्या. या सगळ्या गोष्टींचा असा काही परिणाम झाला की राज्यसेवा मुलाखतीत थेट 62 गुण आले, आणि…

स्वतःचा स्वत:विषयीचा आणि इतरांचा अंदाज चुकवत ही स्वारी “तहसीलदार” बनली. निवडयादी प्रसिद्ध झाल्यावर मी अभिनंदनासाठी फोन केला.
यांचं उत्तर होता…

“सर, चमत्कारच झाला, तुमचं म्हणणं खरं ठरलं”.

विद्यार्थी मित्रहो याला काय म्हणाल?

नशीब, luck, आईवडिलांची पुण्याई की MPSC चा आशीर्वाद की आणखीन काही…

माझं मत आहे की, सातत्यपूर्ण अभ्यास, एखादी गोष्ट मनाला पटल्यावर केलेली अपार मेहनत या बाबी नशिबाला सुध्दा आपल्याकडे ओढून आणतात आणि आपल्याला यशाकडे घेऊन जातात.

म्हणून मी या लेखाला शीर्षक दिलंय…

“सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं|”

All the Best…!

(सदर लेख स्पर्धा परीक्षा लेखक मनोहर भोळे सरांच्या ‘अभ्यास ते अधिकारी‘ या ब्लॉगवरून घेण्यात आला आहे.)

Share This Article