लग्नानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला ; शीतल झाली महसूल सहायक!
MPSC : ग्रामीण भागातील वातावरणात अजूनही लवकर लग्न होताना दिसते. पण मुलींना लग्नानंतर देखील शिक्षणासाठी आणि विविध परीक्षा, नोकरीसाठी प्रोत्साहित केले तर मुली नक्कीच गगनभरारी घेऊ शकतात. हेच शीतलने दाखवून दिले. पतीच्या मदतीने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ध्येयाने शीतल यांनी जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात शीतल भोज-ताकाटे यांचे नाव आल्याने चांदोरी व कारसूळ येथे आनंदोत्सव करण्यात आला.
शितलचे प्राथमिक शिक्षण ओणेवाट जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात, तर बारावीनंतरचे शिक्षण नाशिकच्या के.आर.टी. महाविद्यालयात झाले. पुढे तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. अतिशय मेहनत करून आई रत्ना भोज यांनी मुलगी शीतल आणि भाऊ प्रदीप यांना शिकविले. वडिलांच्या मृत्यूनंतर शितलने स्वतःच्या मनात त्यांची इच्छा पूर्ण करण्याची खूणगाठ बांधली.
तीन महिन्यांपूर्वी तिचे लग्न कारसूळ येथील पोलिस उपनिरीक्षक असलेल्या प्रशांत ताकाटे यांच्याशी झाले. पती प्रशांतही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पाेलिस उपनिरीक्षकपदासाठी प्रयत्न करीत होते. तिला देखील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले.आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करताना प्रत्येकाने शासकीय सेवेची तयारी करायला मदत केली. यातून तिने देखील जिद्दीने अहोरात्र मेहनत घेतली आणि तिची महसूल सहायक पदी निवड झाली.‘मुलगी शिकली, तर दोन्ही घरी प्रकाश देते’, ही वडिलांची इच्छा तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पूर्ण केली.