चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा चीनने थांबवला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘वन बेल्ट वन रोड’चा (ओबीओआर) महत्त्वपूर्ण भाग आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. या माध्यमातून पश्चिम चीनला अरबी सुमद्राला जोडण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र या योजनेतील प्रकल्पांचा अर्थ पुरवठा चीनने खंडित केला आहे. याचा फटका किमान तीन मोठ्या प्रकल्पांना बसू शकतो. चीनने आर्थिक रसद रोखल्याने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वेग मंदावणार आहे. चीनने अर्थ पुरवठा थांबवल्याने डेरा इस्लाइल खान-झोब रोड, खुजदार-बसिमा रोड, रायकोटपासून थाकोटला जाणारा काराकोरम महामार्ग हे तीन मोठे प्रकल्प रखडणार आहेत. यामुळेच चीनच्या निर्णयानंतर पाकिस्तानला धक्का बसला आहे.