ना घरावर छप्पर, ना गॅस भरण्यासाठी पैसे.. खडतर परिस्थितीत पवन कुमारने UPSC क्रॅक केली
UPSC Success Story : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राहणारे पवन कुमार यांची कहानी ही खरोखर प्रेरणादायी आहे. गरिबी आणि खडतर परिस्थितींच्या मध्येही शिक्षणाच्या बळावर त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पवन कुमार हे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोक रोज कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात.
पवन कुमार यांच्या घराची अवस्था खूप वाईट होती. घराला छताऐवजी ताडपत्री होती आणि पॉलिथिनचा वापर करावा लागत होता. घरात गॅस सिलिंडर होता पण गॅस भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून ते चुलीवर अन्न शिजवायचे. पवन यांना शिकायचे होते म्हणून त्यांच्या बहिणींनीही शेतात काम करून पैसे कमावले.
पवन कुमार यांनी नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षांच्या कोचिंगच्या मदतीने त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. उज्जवला योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळाला, ज्यामुळे त्यांचे जीवन थोडे सुलभ झाले.
पवन कुमार यांचे वडील मुकेश मनरेगामध्ये मजुर म्हणून काम करतात. पवन यांनी सेकंडहँड मोबाईल वापरून ऑनलाइन शिक्षण घेतले आणि खूप अभ्यास केला. त्यांची ही जिद्द आणि मेहनत आज त्यांना आयएएस अधिकारी बनवण्यात यशस्वी झाली आहे.