वृत्तपत्र विक्रेताच्या दोन्ही मुली झाल्या उच्चशिक्षित ; स्नेहल आणि निकिता ठरल्या पिंगळे घराण्याचा अभिमान !
पिंगळे कुटूंबाला ‘मुलगा हवा’ या हव्यासापायी अनेकदा हिणवलं जायचं. पण “माझ्या मुली या मुलीच असून, त्यांचे अवकाश ते शोधतील. मुलींना शिकवावे, त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे. त्या कधीच कुणावर अवलंबून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी.मुलींना शिक्षणाबरोबरच करिअर करण्याची संधी द्यावी”. या विचारांवर राजेंद्र पिंगळे हे कायम ठाम राहिले.
ते बाणेर परिसरात १९७७ पासून वृत्तपत्र विक्री करतात. त्यांनी केवळ संसार सावरला नाही तर दोन मुलींना उच्च शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्यांची मोठी मुलगी स्नेहल सनदी लेखापाल (सीए) आणि धाकटी मुलगी निकीता कंपनी सेक्रेटरी (सीएस) झाली आहे. स्नेहल एका आंतरराष्ट्रीय कंपनीत संचालक पदावर, तर निकीता ब्रिटनच्या एका कंपनीची सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून रुजू झाली आहे.
स्नेहलने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स तर धाकट्या निकीताने मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तर २००१ च्या दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत स्नेहलने डिलाईट या आंतरराष्ट्रीय सीए फर्ममध्ये कामाला सुरुवात केली. सध्या ती त्याच कंपनीच्या संचालक पदावर ती कार्यरत आहे. तर निकीताला सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून ७० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
खरंतर राजेंद्र पिंगळे यांनी वृत्तपत्र व्यावसायात ४५ पावसाळे बघितले असून, आजही ते दिवसाला ३०० पेपर टाकतात.
जेव्हा त्यांनी जेव्हा काम सुरू केले तेव्हा अशी स्थिती नव्हती. कोणताही जोडधंदा नसताना या व्यवसायावर कुटुंब चालविले. परिस्थितीशी संघर्ष जरी असला तरी मुलींच्या शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. ते स्वतः वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्याने मुलींतही ती आवड रुजविली. स्नेहल आणि निकिता यांनी देखील दिवसरात्र मेहनत घेतली. आपल्याला स्वावलंबी बनायचे आहे, हा ध्यास घेऊन चिकाटीने अभ्यास देखील केला. म्हणूनच, सध्या चांगल्या इतक्या मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. तसेच सगळ्यांच्या अभिमान बनल्या आहेत.