सातवी पास आईने मुलीला बनवले उप-जिल्हाधिकारी ; वाचा पूजाचा संघर्षमय प्रवास..
सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एका मातेने आपल्या मुलीला २२ व्या वर्षी उप-जिल्हाधिकारी बनवलं आहे. मुलीच्या या कामगिरिमुळे पंचक्रोशीत सध्या त्या चर्चेत आहेत.अरुणा तानाजी गायकवाड असं आईचं नाव असून पूजा तानाजी गायकवाड असं उप-जिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या तरुणीचं नाव आहे. एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत पूजा महाराष्ट्रातून दुसरी आली. दिवसरात्र अभ्यास करून तिने हे यश संपादन केल आहे.
सातवीत असतानाच आपण उच्च पदावर जायचं हे पूजानं ठरवलं होतं. दहावीत ९० टक्के तर बारावी मध्ये ९१ टक्के मिळवत ते तिने सिद्ध केलं.त्यामुळे भविष्यात ती मोठी अधिकारी होणार हे निश्चित होते.दरम्यान, काही दिवसांनी ती राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर रुजू होणार आहे. २०१६ ला घरची परिस्थिती नाजूक असताना अवघ्या ५ हजार रुपयात पूजाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
अभ्यासासाठी लागणारी महत्वाची पुस्तके घेतली.सुरुवातीला ही परीक्षा पूजा पास झाली त्यामधून तिची निवड नायब तहसीलदार पदासाठी झाली होती. मात्र, ती नाराज होती. तिचं स्वप्न मोठं होतं, ती हताश झाली नाही तिने पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायची हे ठरवले. यासाठी तिने १४ ते १५ तास अभ्यास केल्याचं ती सांगते. या काळात आई अरुणा यांचा मोठा हातभार लागला. घरातील कुठलंच काम पूजाला आईने करू दिलं नाही.तिला वेळेत जेवण देण्याचं काम देखील आई ने केलं. अरुणा या इयत्ता ७ वी शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व माहित आहे. त्या पूजाला कायम प्रोत्साहन देत.
नायब तहसीलदार असताना पूजाने पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली.आठ महिन्याच्या कालावधीत स्वतः ला अभ्यासात झोकून देत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. गायकवाड कुटुंबाला सरकारी नोकरीचे आकर्षण पहिल्यापासून होते. मुलींना स्वतः च्या पायावर उभं करायचं अस चंग आई वडीलांनी बांधला होता. पूजाला दोन बहिणी असून पूजा ही धाकटी आहे.त्यामुळे आई अरुणा आणि वडील तानाजी यांनी लग्नकरीता पैसे न जमवता त्यांनी ते पैसे मुलींच्या शिक्षणावर खर्च केले.
परीक्षेसाठी मराठी एवढीच इंग्रजी महत्वाची आहे.स्वप्न मोठी हवीत तरुण तरुणांनी मिळेल ती परीक्षा द्यावी जेणेकरून तुम्ही हताश होणार नाहीत.स्वतःला लहान समजू नका स्पर्धा ही स्वतः शी असते असा संदेश पूजा ने विद्यार्थाना दिला आहे. उप-जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर पूजा ला सरकारी योजना सामान्य नागरीकांपर्यंत पोहचवायच्या असून महिलांना आणि मुलींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तिने धेयप्राप्ती केली यात मला समाधान आहे. आमच्यात आई आणि मुलीचं नात नसून ते मैत्रीचे आहे असंही पूजाच्या आईने म्हटलं आहे.
-कृष्णा पांचाळ, पिंपरी
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
फेसबुक पेज : Mission MPSC | टेलिग्राम चॅनल : @MissionMPSC