असं म्हणतात की जर तुम्हाला प्रामाणिक मनाने एखादी गोष्ट हवी असेल तर संपूर्ण विश्व तुमच्याकडून ती घडवून आणण्याचा प्रयत्न करते, पण त्यासोबत तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आपल्या राज्यातील काही अधिकारी असे आहेत, ज्यांच्या संघर्षाच्या कथा अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील महागावचे रहिवासी IAS अधिकारी रमेश घोलप. जे तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. IAS Ramesh Gholap
रमेश घोलप यांचे वडील गोरख घोलप हे वाहनांचं पंक्चर काढायचे. लहानपणी रमेश यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. रमेश यांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हालाखीच्या परिस्थितीत जगत होतं. रमेश यांची आई विमलदेवी रस्त्यावर बांगड्या विकायच्या. कधी रमेश आईला मदत करायचे तर कधी वडिलांच्या कामात मदत करायचे.
रमेश यांचं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झालं. गावात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मामाच्या गावी बार्शीला गेले. 2005 साली ते बारावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मामाच्या गावापासून घरापर्यंत जाण्यासाठी बसने 7 रुपये लागायचे. मात्र रमेश पोलिओग्रस्त असल्याने त्यांचं तिकीट फक्त 2 रुपये होतं. पण वेळ बघा, त्यांच्याकडे त्यावेळी 2 रुपयेही नव्हते.
रमेश यांना 12वी बोर्डाच्या परीक्षेत 88.50 टक्के गुण मिळाले होते. एज्युकेशनमध्ये डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी गावातल्याच शाळेत शिकवायला सुरुवात केली. डिप्लोमासोबतच त्यांनी बीएची डिग्रीही पूर्ण केली. त्यांच्या आईला सामूहिक कर्ज योजनेअंतर्गत गाय खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपये कर्ज मिळालं. या पैशांतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
अखेर 2012 मध्ये रमेशच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि रमेश यांनी यूपीएससी परीक्षेत 287 वा क्रमांक मिळविला. त्याच वर्षी राज्यसेवा परीक्षेत ते राज्यातून पहिले आले. आयएएस रमेश घोलप झारखंड केडरचे अधिकारी आहेत. सध्या ते झारखंडमधील गढवाचे जिल्हाधिकारी आहेत. अशा प्रकारे कोणत्याही कोचिंगचा सहारा न घेता अशिक्षित आई-वडिलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला. वरिष्ठ अधिकारी होईपर्यंत गावकऱ्यांना तोंड दाखवणार नाही, अशी शपथ रमेशने गावकऱ्यांना दिली होती.