कोणत्याही सुखसोयी नाही…वडिलांच्या हिस्स्याला साडेतीन एकर शेती….यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकांना फटका…कधी पीकांना भावही मिळत नाही. वर्षाला दोन लाख रुपये नफा मिळतो. अशा परिस्थितीत देखील नीलकृष्णच्या आई – वडिलांनी त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे आई – वडील वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा या छोट्याशा गावातले शेतकरी आहेत.
नीलकृष्ण हा लहानपणापासूनच हुशार होता. त्याला अभ्यासाची आवड असल्यानेपहाटे पाच वाजता उठून अभ्यास करायचा, त्यानंतर पाच ते सहा तास शिकवणी वर्ग आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास अशी त्याची दिनचर्या करायचा.त्याला चांगलं शिक्षण मिळावं याची काळजी त्याच्या आई-वडिलांनी घेतली. त्याला पाचवीपासूनच कारंजा लाड येथे ठेवले. तिकडे त्याने भाड्याच्या खोलीत राहून त्याने अभ्यास केला. पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण कारंजा इथल्या जे. सी. हायस्कूलमधून पूर्ण केलं. दहावीत त्याला ९८ टक्के गुण मिळाले होते. आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या निलकृष्णनं दहावीनंतर त्या दृष्टीनं वाटचाल केली.
त्यानं शेगावच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा जेईईच्या तयारीसाठी नागपूरला आला. नागपुरातही भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केलं. नागपुरातून ट्रेनने कधी शेगावला महाविद्यालयात जायचा. पण, त्याने जेईईच्या अभ्यासावरच पूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं.नीलकृष्ण जेईईचा अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहिला. पण, सततच्या अभ्यासातूनही कधी कधी कंटाळा येतो म्हणून पंधरा दिवसातून एकवेळा चित्रपट पाहायचा. त्याला अभ्यासाची आणि परिस्थितीची जाणीव होती.
आपल्याला शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी त्याने कुठून शिष्यवृत्ती मिळते का यासाठी प्रयत्न केले. त्याने शिकवणी वर्गाची परीक्षा देऊन त्यांच्याकडून ७५ टक्के शिष्यवृत्ती मिळवली. अहोरात्र मेहनत करत जेईईमध्ये देशात पहिला क्रमांक पटकवण्याचं स्वप्न पूर्ण केले.