आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असते. हेच आदित्य पोळ या २४ वर्षीय तरूणाने करून दाखवले आहे. आटपाडी तालुक्यातील माळेवाडी या छोट्याशा गावी जन्मलेल्या या मुलाची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आदित्यचे वडील रिक्षा चालवायचे रिक्षाची चाके रात्रंदिवस धावत असायची.चांगले शिक्षण घेऊन आपल्या मुलाला यशस्वी झालेले पहायचेय म्हणून वडील कष्ट घ्यायचे.
२०२१ च्या मे महिन्यात वडिलांचे निधन झाले आणि आदित्य वडिलांच्या पाठबळाला कायमचा मुकला. पण तो थांबला नाही. अंगावर खाकी वर्दी घालायचीच हे ध्येय मनाशी बाळगून त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. हक्काचा आधार गेल्याने आर्थिक परिस्थिती अधिक बेताची झाली.
म्हणून, त्याने गावीच राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अभ्यासाच्या जोरावर ऑनलाइन क्लासेस घेणे सुरू केले व घर खर्च भागवला.यात आईची मोलाची साथ आणि मायेचा हात त्याला कायम ऊर्जा देत गेला. म्हणूनच, या कष्टाला फळ मिळाले आणि त्याची Dysp पदी निवड झाली.