MPSC Success Story : धनंजय राजेंद्र कोळी या तरूणाची परिस्थिती ही बेताची होती.कारण, लहानपणीच हक्काचा आधार पितृछत्र हरपले… त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या आईवर आली. पण आईने तिच्या आईच्या कष्टाचे चीज करीत मुलांना शिक्षणासाठी कायम पाठिंबा दिला.आईला मजुरीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून धनंजय व त्याचा मोठा भाऊ कामासाठी सुरतला गेले. अधूनमधून येत अकरावी पूर्ण केली.
नंतर परत येऊन बारावीपर्यंत शिक्षण अमळगावात झाल्यावर आईने धंनजयला अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवले.महाविद्यालयात शिक्षण घेताना ‘कमवा शिका योजने’त सहभाग घेतला. खेड्यावरून ये-जा करून महाविद्यालयात राबून मिळेल त्या वेळेत अभ्यास करीत होता. त्याच पैशांवर शिक्षण घेऊन धनंजयने पदवीचे शिक्षण २०२१मध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
लगेच, २०२२ मध्ये एमपीएस्सी परीक्षा जाहीर झाली. धनंजयने पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात धंनजय उत्तीर्ण झाला. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन आता फौजदार बनला आहे. ‘एमपीएससी’च्या परीक्षेत ४४० पैकी ३०१.५० गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.