MPSC PSI Success Story : खरंतर, परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. ती हवेली तालुक्यातील थेऊर या गावची रहिवासी. गायत्री ही शेतकरी कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिचे वडील ज्ञानेश्वर चंद आणि आई पुष्पा चंद हे दांपत्य शेतकरी आहेत. गायत्रीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण थेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक झाले. माध्यमिक शिक्षण चिंतामणी विद्या मंदिर थेऊर येथे झाले. पुढे, तिने वाणिज्य शाखेची पदवी हडपसर येथील साधना संकुल येथून प्राप्त केली. पदवी शिक्षण घेत असताना तिने अहोरात्र मेहनत करून अभ्यास केला. इतकेच नाहीतर मैदानी सराव देखील केला. या स्पर्धा परीक्षेसाठी आई वडिलांसह तिचे आजी-आजोबा आणि अर्थशास्त्र शिकवणारे देशमुख सर यांचे मार्गदर्शन तिला मिळाले.
कोणत्याही प्रकारचे स्पर्धा परिक्षेचे क्लासेस न लावता महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या गुणवत्ता यादीत आठव्या क्रमांकावर तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलगी गायत्री ज्ञानेश्वर चंद हिने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याने अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.मित्रांनो, आयुष्यात संयमाला जिद्दीची साथ असेल तर यश हे नक्कीच मिळते.