पहिल्या प्रयत्नात रोहित झाला पोलिस उपनिरीक्षक! त्याची ही यशोगाथा नक्की वाचा…
सिन्नर शहरातील अष्टविनायक नगर येथील रोहित जाधव याने एमपीएससीमध्ये यश मिळवले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशामुळे आई-वडिलांचा ऊर भरून आला. यामागे प्रचंड चिकाटी आणि मेहनत घेतली आहे. त्याची ही यशोगाथा नक्की वाचा…
रोहितचे वडील नानासाहेब मुसळगाव येथील बोरा क्रिस कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरीला आहेत कमी अधिक उत्पन्नातून जाधव दांपत्य घर खर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवला. या परिस्थितीत आई-वडिलांची होणारी घालमेल बघता त्यांचा मोठा मुलगा रोहित याने ही परिस्थिती बदलवण्याचा निश्चय केला.
जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत अन् हुशारीच्या जोरावर त्याने शालेय शिक्षण सिन्नर येथील स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या ज्ञान संकुलात अर्थात एस जी पब्लिक स्कूल माध्यमिक विभाग येथे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व पदवी राजे छत्रपती संभाजी स्कूल धुळे तसेच महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणीक प्रवासात रोहितने अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन केला. तरी देखील न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला. आपल्याला सक्षम व समाजपयोगी कार्य करायचे असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देण्याचा त्याने निश्चय केला. यासाठी त्याने पुणे शहर गाठले. एक ते दीड वर्ष चांगला अभ्यास केला.
पुणे येथे लायब्ररीमध्ये स्वतः अभ्यास करून व. योग्य नियोजन करीत अभ्यास केला. याचे फलित स्वरुपात त्याने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीच्या पोलिस उपनिरीक्षक पदी यश संपादन केले.