MPSC उमेदवारांसाठी खुशखबर आहे एमपीएससीच्या (MPSC) या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
एमपीएससीकडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात 161 पदांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आता अन्य पदांची मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आल्याने ही पदे राज्यसेवा 2022 च्या पदभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसेवा 2022 च्या जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून 340 पदे वाढल्याने एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.
वाढलेल्या पदांमध्ये उपजिल्हाधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 33, पोलीस उपअधीक्षक गट ‘अ’ संवर्गाची 41, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट ‘अ’ संवर्गाची 47, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट ‘अ’ संवर्गाची 14, उपनिबंधक सहकारी संस्था गट ‘अ’ संवर्गाची दोन पदांची भरती वाढवण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात येतात. विशेषत: पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला. तसा तो एमपीएससीवरही झाला. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अश्यात आता पदभरती वाढवली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
वाढलेल्या पदांमध्ये
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42