येत्या रविवारी (२१ ऑगस्ट) होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. नेमक्या त्या सूचना कोणत्या आहेत. ते जाणून घ्या.. Mpsc Rajyaseva Pre-Examination 2022
या आहेत सूचना?
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.
(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरकरिता स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे.
(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
(५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
(७) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(८) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
( ९ ) कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह ( Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील.
(१०) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.
(११) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.