MPSC Success Story ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा व स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाविषयी न्यूनगंड दिसून येतो. त्यात आपल्या आई, वडील व नातेवाईकांचे स्वप्न पूर्ण करावे, ही जबाबदारी असतेच. असाच मोहोळ तालुक्यातील अंकोली या गावात राहणारा, गरीब परिस्थिती मध्ये जन्मलेला अक्षय अवताडे या युवकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी गट-अच्या परीक्षेत निवड झाली आहे.
अक्षय अवताडे यांचे प्राथमिक शिक्षण अंकोली येथील जिल्हा परिषद शाळा येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अकरावी व बारावी सुयश जुनिअर कॉलेज सोलापूर येथे झाले. त्याने खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची देखील तयारी सुरू केली.पण परिस्थिती बेताची असल्याने कठीण परिस्थितीत कशी तयारी करावी? हा त्याच्या पुढचा मोठा प्रश्न होता. तरी त्याने कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वतःवर विश्वास ठेऊन अभ्यास केला. याच दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला येथे पदव्युत्तर शिक्षण चालू ठेवले.
जर उच्च शिक्षण असेल तर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे त्याने फक्त तयारी न करता, आपला अभ्यास देखील चालू ठेवला. त्यामुळे, मनात जिद्द, कष्ट व प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली की यश आपोआप मिळते. असेच, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अक्षय अवताडे यांस यश मिळाले.