MPSC Success Story शासकीय अधिकाऱ्याला गावात मोठे साहेब म्हणण्याची पद्धत आहे. तसं आपल्या मुलाने पण मोठा साहेब व्हावे, या उद्देशानेप्रल्हाद घ्यार यांनी मुलांना शिकवले. नुसते शिकवले नाहीतर उच्च शिक्षित केले. पोराने देखील जाणीव ठेवून एमपीएससीमध्ये यश मिळवले. साटंबा येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर घ्यार यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवित उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ज्ञानेश्वर घ्यार यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. दहावी व बारावीचे शिक्षण हिंगोली जिल्ह्यातच झाले. घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेच घरात प्रशासकीय सेवेचा कोणताही वारसा नाही. स्पर्धा परीक्षा संदर्भात वृत्तपत्रे व शिकवणी वर्गातून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे हे स्वप्न बाळगले.
त्यानंतर सर्वच स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. सतत अभ्यास व कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्याने पहिल्याच प्रयत्नात दोन वर्षापूर्वी चंद्रपूर येथे भारतीय टपाल खात्यात डाक सहायक या पदावर नियुक्ती मिळाली. उपाधीक्षक भूमी अभिलेख परीक्षेत डाक सहायक म्हणून काम करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या उपाधीक्षक भूमी अभिलेख या पदाच्या परीक्षेत देखील यशस्वीपणे यश मिळविले.
त्याने या काळात सतत अभ्यास केला. त्यासाठी त्याला कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी सतत प्रोत्साहान आणि बळ मिळाले. त्यामुळेच, आज या पदावर पोचले आहेत.
त्यांनी दीड वर्षापूर्वी झालेल्या राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज केला. त्यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीत चांगले गुण प्राप्त केले. त्यांचे स्वप्न साकार झाले आणि त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळाले.
मित्रांनो, कोणतीही परीक्षा देताना मन लावून अभ्यास केला, सतत मनन करून लिखाण केल्यास पाठांतर वाढते. त्याचा उपयोग परीक्षेत नक्कीच होतो. यासाठी मात्र सतत अभ्यास केला पाहिजे. मग यश आपलेच असते.