⁠
Inspirational

आठवडे बाजारातील घड्याळ विक्रेता ते पोलिस उपनिरीक्षकपद ; वाचा गौरवची ही संघर्षमय यशोगाथा..

MPSC PSI Success Story : आर्थिक परिस्थिती बेताची…. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून….आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, अशी लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. वेताळ कुटुंबाच्या संघर्षमय आयुष्याला मोठा मुलगा गौरव पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर अनेकांना प्रेरणा मिळाली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुल्हेर (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबातील कला शाखेचा विद्यार्थी गौरव वेताळ (चौधरी) याने दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातल्याने पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.. मुल्हेर येथील शिवाजी वेताळ-चौधरी परिवाराचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून गौरवच्या आई छाया गृहिणी. शेती व्यवसायसोबत घराला आर्थिक हातभार लावण्याच्या हेतूने गौरव याने आठवडे बाजारात घड्याळाचे दुकान सुरू केले.

गौरवचे प्राथमिक शिक्षण मुल्हेरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षणही त्याने मुल्हेरच्या माध्यमिक त्याने पूर्ण केले.त्यानंतर ताहाराबाद येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात पदवीच्या कला शाखेचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची परिपूर्ण जाणीव गौरवला होती.

ज्ञानार्जनासोबत आपल्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी गौरवने वडिलांचा घड्याळ विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे सांभाळला.पोलिस दलात अधिकारी आणि खाकीचे आकर्षण होते.

२६ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी नाशिक गाठून सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला. त्यानंतर २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाची पूर्व व मुख्य परीक्षेत त्याने यश मिळविले. परंतु शारीरिक चाचणी परीक्षेवेळी धावताना पाय फ्रॅक्चर झाल्याने यशाने हुलकावणी दिली. तरीही खचून न जाता २०२१ मध्ये पुन्हा एमपीएससीची परीक्षा देवून देदीप्यमान यश गौरवने मिळविले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात शिक्षण घेवून इतर मागास प्रवर्गात राज्यात चौथी रँक मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदी नुकतीच निवड झाली आहे.

Related Articles

Back to top button