एसटी कंडक्टर सुनील पोलशेट्टीवार यांची मुलगी हर्षल पोलशेट्टीवार हिने राज्य करनिरीक्षक सोबतच मंत्रालयातील कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे.
हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात पूर्ण केले. दहावीला ९२ टक्के तर बारावीला ९४ टक्के मिळवले.त्यानंतर आयआयटी करण्याच्या उद्देशाने बारावीकरिता हैदराबादला नारायण स्कूलमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीचे स्वप्न अपुरे राहिल्याने सेवाग्राम येथील बापूराव देशमुख इंजीनियरिंग कॉलेजमध्ये मोटर मेकॅनिकलची पदवी घेतली. त्यानंतर कॅम्पसद्वारे निवडीमुळे एक महिना इंदौर येथे कंपनीत काम केले. त्याचे पॅकेजही उत्तम होते. मात्र तिचे मन कंपनीत रमले नाही. तिने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा तिने इंदौर सोडून पुणे येथे एक वर्ष राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
पण तेव्हा कोरोना काळ सुरू झाला. त्यामुळे तिला गावी परत यावे लागले. याच दरम्यान हर्षलच्या आईने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. आई गेल्यानंतर हर्षल खचून गेली पण स्वतःला सावरत हर्षलने पुन्हा अभ्यास सुरु केला.’घरी हिमतीने अभ्यास कर आणि अधिकारी बनून दाखव’ असे वचन आईचे तिने जिद्दीने पाळले. पण पहिल्या एमपीएससी प्रयत्नात तिला सहा गुण कमी पडले.हर्षलला अपयशाचे धक्के पचविणे कठीण होते. हर्षल कठीण परिस्थितीशी झगडत होती. तीन वर्षापासून जीवनात होत असलेले चढ उताराचे क्षण ती अनुभवत होती.
अखेर, तिच्या स्वप्नांची पूर्ती झाली. तिला एकाच वेळी राज्यकर निरीक्षक मंत्रालयातील व सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून पद मिळाले. पण भविष्यात तिला उपजिल्हाधिकारी बनण्याचा मानस आहे. तिला गडचिरोलीकरांकडून तिने कौतुकाची थाप मिळाली आहे.