⁠  ⁠

सात वेळा अपयश; खडतर प्रवासानंतर अखेर विठ्ठलने मिळविली सरकारी नोकरी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : आपली परिस्थिती हीच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक बनत असते. विठ्ठल किसन कोळेकर या तरूणांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत बेताची होती. पळशी (ता. बारामती) येथील किसन व विजया कोळेकर या दांपत्याला तीन मुली आणि विठ्ठल हा एकटा मुलगा आहे.लहानपणापासून मेंढपाळ कुटुंबात जडणघडण झाली. त्यांची अवघी दोन एकर जिराईत शेती… त्यामुळे त्याचे वडील हे बिगारीकाम, गवंडीकाम करून साऱ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

त्याचे आई – वडील दोघेही अल्पशिक्षित आहेत, मात्र करत राहा, प्रयत्न सोडू नको’, असे ते नेह‌मी म्ह‌णत असतं.विठ्ठलचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पळशी येथे आणि माध्यमिक शिक्षण अनंतराव पवार विद्यालयात पूर्ण झाले. वाघोलीतील जेएसपीएम महाविद्यालयात त्याने बी.ई. सिव्हिलची पदवी घेतली. त्याचा शैक्षणिक भार पेलण्यासाठी वडील गवंडीकामातूनच सेंट्रोंग शिकले. विठ्ठलने पदवीनंतर नोकरीऐवजी स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचे ठरविले. या प्रवासात त्याला पाच वर्षांत सात वेळा अपयश आले, परंतु अलीकडच्या आठ महिन्यांत तब्बल सात स्पर्धा परीक्षांमध्ये सलग यश मिळवत त्याने आपल्या यशाला सप्तरंगी साज चढविला आहे.

एमपीएससीमार्फत झालेल्या इंजिनिअरिंग सर्विसेसच्या २०१९, २०२० व २०२१ या तीन वर्षांत दिलेल्या तीन परिक्षांमध्ये त्याला चांगले यश मिळाले, परंतू मुलाखतीच्या टप्प्यात त्याला अपयश मिळाले.वडिलांच्या पाठिंब्याने २०२२पासून पुन्हा अधिक जीव ओतून कृष्णाली अभ्यासिकेत त्याने अभ्यास केला.

सात वेळा आलेले अपयश पाठीमागे टाकत २०२३मध्ये त्याने सरळसेवेच्या सलग सात परिक्षा दिल्या.अखेर या खडतर प्रवासानंतर २६ जानेवारी २०२४च्या पहिल्या निकालातून तो सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झाला.

Share This Article