MPSC Success Story : कविताची जडणघडण छोट्याशा गावात झाली. ज्या गावात कोणत्याही प्रगत सोयीसुविधा नाहीत. तिचे आई-वडील दोघेही विहीर खोदण्याचे काम करतात. आई रमाबाई अवघड अशा यारीच्या यंत्रावर काम करतात तर वडील भिमू राठोड खोलवर विहीर खणतात. भाऊही त्यांच्यासोबत कामावर जातो. या कुटुंबाने कष्टाची कामे करत कविता हिला शिकवले.
तिने देखील या कष्टाची जाणीव ठेवली. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेले गाव आसंगी तुर्क. जत तालुक्यातील तुर्क सारख्या दुष्काळी भागातील कविता भिमु राठोड या मुलीने एकाचवेळी कर सहायक म्हणून भटक्या विमुक्त जाती अ प्रवर्गात राज्यात पहिली तर मंत्रालय लिपिक म्हणूनही राज्यात चौथी येण्याचा मान मिळवला आहे.
कविताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण हे कधी बौद्ध विहाराच्या कोपऱ्यात तर काहीवेळा पडक्या घरात भरणाऱ्या शाळेत झाले. आई-वडील कामाच्या निमित्ताने स्थलांतरित होत असल्याने शाळेत सलग शिकणे हे अवघड होते.अकरावी व बारावीसाठी तर ती सायकलवरून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या संख येथील राजारामबापू पाटील या महाविद्यालयात जात असे. त्यांच्या गावात व समाजात विज्ञान शाखेतून शिकवणारी ही एकमेव मुलगी असावी.बारावीत सकाळी क्लासेस असायचे त्यामुळे पहाटे ४ वाजता उठून सायकलवरून तेरा किलोमीटर प्रवास करून तिला जावे लागायचे. तरीही तिने जिद्दीने ७० टक्के गुण मिळावले. पुढे विज्ञान शाखेतच शिकण्याची इच्छा होती, पण वेळेत प्रक्रिया न समजल्याने प्रवेश घेता आला नाही. पदवीसाठी नाईलाजास्तव बीएला प्रवेश घेतला.
विटा येथे बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश मिळाला, पण कॉलेजला पलूसला आर्टस् कॉमर्स कॉलेजला जावे लागले. तिथे शिकत असताना इस्लामपूरच्या अस्लम शिकलगार यांच्या महाराष्ट्र अकॅडेमीची माहिती मिळाली. जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देऊन आता माघार घ्यायची नाही आणि शासकीय नोकरी मिळवायचीच असा चंग बांधला. झटून अभ्यास केला.कविता हिने महाराष्ट्र अकॅडेमीत बारा ते चौदा तास अभ्यास केला. अस्लम शिकलगार यांनी प्रेरणा दिली. सतत आरोग्याच्या तक्रारी होत्या. तरीही घरातील सदस्य समजून सांभाळून घेतले.
या सगळ्याची तिने देखील जाणीव ठेवली. तिने निर्धार केला की इतक्या वयातही पहाटे चार वाजता उठून आईवडील इतकी कष्टाची कामे करतात, तर आपण अभ्यास का नाही करू शकत? असे नेहमी वाटायचे. आणि इतक्या कष्टातून बहीण-भाऊही आपणाला सपोर्ट करतायत हे पाहून प्रेरणा मिळायची. यातूनच ती यश मिळवू शकली.बंजारा समाजातील कविता राठोड ही युवती लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकाच वेळी दोन पदे मिळवत राज्यात पहिली आणि चौथी आली आहे. अ प्रवर्गात राज्यात पहिली तर मंत्रालय लिपिक म्हणूनही राज्यात चौथी येण्याचा मान मिळवला आहे.