खरंतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मदत करत असते. फक्त परिस्थिती बदलण्यासाठी धडपडण्याची तयारी हवी. परीक्षित गुलाब सनेर याची घरची परिस्थिती ही बेताची होती. अवघी दोन एकर जमीन….सारे कुटुंब शेतीवर अवलंबून होते.
परीक्षितने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अनेकदा गावी जाऊन अनेकदा वडिलांसोबत शेतात काम केले. शेती काम करीतच अभ्यास सुरू ठेवला मात्र, जिद्द सोडली नाही. मूळात चोपडा तालुक्यातील हातेड गावचा हा लेक.त्याचे शालेय शिक्षण हे हातेडला झाले. पुढे त्याने चोपडा येथील एम. जी. महाविद्यालयातून ऑरगॅनिक केमस्ट्री या विषयात एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण केले.
पदवीनंतर २०१७ मध्ये त्याने स्पर्धा परीक्षची तयारी सुरू केली. कोविडच्या काळात दोन वर्षे वाया गेले. पण शिक्षणाची आणि परीक्षेच्या तयारीची कास काही सोडली नाही. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने तीनदा प्रयत्न केले पण त्यात अपयश आले. पण अपयशाला घाबरून देखील गेला नाही. अभ्यास करत राहिला. चौथ्या प्रयत्नात फौजदार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सुट्टीत वडिलांसोबत शेती करीतच त्याने हे यश संपादन केले. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो, हेच त्याने दाखवून दिले.