जिद्दीला सलाम! गवंडी काम करणारा बनला नायब तहसीलदार, हा प्रेरणादायी प्रवास वाचाच..
MPSC Success Story आपल्या गरिबीवर व अथक परिश्रमाने कष्ट करून मिळवलेले यश हे कायम अनेकांसाठी प्रेरणादायी असते.कारण, यात मेहनती सोबत अडचणींवर मात करण्याची देखील ताकद असते. असेच गुणवरे गावचा लेक प्रतीक मुकेश आढाव यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये २५४वी रँक मिळवत नायब तहसिलदार हे पद मिळवले आहे.
प्रतीकची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. कोणत्याही सोयीसुविधा नसताना देखील एमपीएससीमध्ये मिळवलेले हे यश खरंच कौतुकास्पद आहे. त्याचे इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवरे या ठिकाणी झाले. गावात सोयीसुविधा नसल्याने तो पुढील शिक्षणासाठी माण तालुक्यातील वडजल या गावी आपल्या मामाकडे गेला. तिथे त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे, इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण याठिकाणी घेतले. आई – वडिल अशिक्षित असले तरी मुलांना शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या.
बिकट परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करत प्रतीकचे वडील मुकेश कोंडीराम आढाव हे स्वतः गवंडी व बिगारी म्हणून काम करतं. तर आई महानंदा मोलमजुरी करतात. या परिस्थितीतून देखील प्रतीकला त्यांनी शिक्षण दिले. प्रतिकचा लहान भाऊ देखील एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. आई – वडील, मामा, आजी सगळ्या कुटुंबाचा प्रतीकला शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठिंबा होता. बारावीनंतर त्यांनी पुणे येथील आनंदराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मेकॅनिकल बॅचमध्ये आपले शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
त्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवले. २०१८ ला तिथे त्याने एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.२०१८,२०१९ ला त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. रेंजर फॉरेस्ट ऑफिसर म्हणूनही त्यांची निवड झाली परंतु पुढील तयारीमुळे तो ग्राऊंडला जाऊ शकला नाही.२०२० ची राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा कोविड १९ मुळे पुढे ढकलली. त्याने मार्च २०२१ला पूर्व परीक्षा दिली. डिसेंबर २०२१ला त्याने मुख्य परीक्षा दिली.त्यात त्यांनी यश मिळवले. २५ एप्रिल २०२१ला मुलाखत दिली. त्यात अंतिम २९ गुणवत्ता यादीत २५४ रँक मिळवत नायब तहसिलदारपदी त्याची निवड झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, प्रसंगी बेरोजगारीचे काम करून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत लक्ष साध्य करणारे प्रतीक आढाव हे उपेक्षित समाजातील भविष्यातील भावी पिढीसाठी दिशादर्शक आहेत.