सामन्य शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या प्रियंकाचा असामान्य प्रवास !
MPSC Success Story : बिकट परिस्थिती देखील प्रशासकीय अधिकारी होणे हा काही सोपा प्रवास नाही. आपल्या कौटुंबिक आणि इतर परिस्थितीची जाण ठेवून प्रियंका घोरपडे हिने शिक्षण पूर्ण केले. तसेच अनेक अडचणींवर मात करत प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय साध्य केले.
प्रियांका ही नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली लेक. ती लहानपणापासूनच हुशार होती. तिचे संपूर्ण कुटूंब हे शेतीवर अवलंबून असल्याने तिला देखील शेतीकामात मदत करावी लागत असतं. परंतू, तिच्या कुटुंबीयांनी तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. याही परिस्थितीतही बीई सिव्हिल पर्यंतचे उच्चशिक्षण प्रियंकाने पूर्ण केले.
प्रियंकाचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्यामंदिर, तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. पुढे क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. समाजाची सेवा करायची या दृष्टीने तिने या क्षेत्रात पाऊल टाकले. ती दररोज नित्यनेमाने वाचन व लेखन करायची, पदवी शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची देखील तयारी चालू केली होती. आपण याच अभियांत्रिकी क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करू शकतो. तिने या उद्देशाने एमपीएससीची परीक्षा दिली.
२०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मधून सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर तिची निवड झाली. आर्थिक अडचणींवर मात करीत प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.