MPSC Success Story : आपल्याला कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते.असेच यश खेड तालुक्यातील बहिरवाडी गावातील सागर राक्षे याने मिळवले आहे. सागरचे आई – वडील हे दोघेही शेतीकाम करतात.बहिरवाडी (ता. खेड) या छोट्याशा खेड्यातील सागर राक्षे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत देदीप्यमान कामगिरी केली असून, तिहेरी यश संपादन केले.
त्यामुळे त्याची लहानपणापासून जडणघडण ही गावातच झाली. त्याचे शालेय शिक्षण हे गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात, तर बारावीपर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाले.
त्याचे आई – वडील शेतीकाम करत असले तरी त्याने आपल्या मुलाला उच्च शिक्षित केले.फक्त उच्च शिक्षण दिले नाहीतर योग्य प्रकारे घडवले.म्हणूनच, सागरने देखील पुढे लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली.पूर्वतयारी करावी म्हणून ठाण्याला युनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो राजगुरुनगरला परतला. त्यानंतर येथील स्वर्गीय बाळासाहेब आपटे अभ्यासिकेत सहा वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास केला.
सातत्याने तो विविध प्रकारच्या सरकारी नोकरी देणाऱ्या परीक्षा देत राहिला. त्यात त्याला अपयश देखील आले.पण तो अभ्यास करत राहिला.यातही राज्यसेवा मुख्य, राज्य विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक या परीक्षा देत राहिला.जिद्द सोडली नाही…आपल्याला एक दिवस नक्कीच यश मिळेल ही इच्छा उराशी बाळगली. अखेर या प्रयत्नांना यश आले. प्रथम नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यानंतर दिलेल्या एमपीएससी परीक्षेत तो राज्य विक्रीकर निरीक्षक पदासाठी पात्र ठरला. याच परीक्षेची एक महिन्यानंतर सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्या यादीत तो सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) या पदासाठी पात्र ठरला. अशा प्रकारे २०२४ या वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेमधून तीन पदांना गवसणी घातली आहे.सागरचे आईवडील शेतकरी असूनही जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले.