आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत शीतलची उपजिल्हाधिकारी पदी झेप !
MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्वसामान्य माणसांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. पण सुरुवातीला अनेक परीक्षेत येणारे अपयश, पुण्यात लागणारा खर्च त्यामुळे अनेक अडचणींचे प्रसंग निर्माण झाले. मात्र आई-वडिलांच्या कष्टाची शितलने निष्ठेने अभ्यास केला. यामुळेच तिची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.
शीतल बाळासाहेब घोलप ही सर्वसामान्य कुटुंबातील लेक.गंगाखेड तालुक्यातील सुप्पा (जहांगीर) गावची मूळ रहिवासी.सर्वसामान्य कुटुंबातून असल्याने व्यवस्थेच्या निम्नस्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा संघर्ष शितलने जवळून पाहिला आहे. यामुळेच तिला अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत राहिले.शीतल हिचे कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. पुढे तिने श्री शिवाजी महाविद्यालयात उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेतले.
सीईटी परिक्षेत तिने परभणी जिल्ह्यातून मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथून कॉम्प्युटर सायन्स या बॅचमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.शिक्षणाची आणि अभ्यासाची आवड असल्याने शीतलला खाजगी कंपनीत नोकरीची संधी मिळत होती. पण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी पद पटकावून समाजसेवेचा संकल्प केला. याच समाजाची सेवा करण्याचे स्वप्न तिने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पाहिले.
कोरोनाच्या काळात पुणे सोडून परभणीत घरी अभ्यास केला.नोव्हेंबर २०२२ मध्ये एमपीएससीमधून सरळ सेवेने राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) या पदावर वस्तू आणि सेवा कर या विभागात निवडली गेली. मार्च २०२३ मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून वन विभागात निवड झाली. तरी तिला अजून वरचे पद हवे होते. यासाठी तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरुच ठेवला.पुढे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. हे प्रशिक्षण तिने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.अभ्यास नीट समजून घेतला की आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली तर यश हमखास मिळू शकते.हे शितलने दाखवून दिले. यामुळेच तिची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात सर्वप्रथम आली आहे.