MPSC Success Story मुलगी चार महिन्यांची असताना बापाने तिला आणि तिच्या आईला सोडून दिले. गरिबी आणि आयुष्यात आलेल्या दुःखावर मात करत अमळनेरच्या तांबेपुरा येथील शीतल पुंडलिक पवार ही पोलिस उपनिरीक्षक झाली आणि उद्ध्वस्त मांडवाच्या दारी जूण वसंत आल्याची अनुभूती या मायलेकींना झाली. शीतल इंदूबाई पुंडलिक पवार असे या फौजदार झालेल्या तरुणीचे नाव.
तिच्या यशाची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. शीतल अवघ्या चार महिन्यांची होती, तेव्हापासून वडिलांनी पत्नी व मुलीला सोडून दिले. नाईलाज म्हणून इंदूबाई माहेरी आल्या. नंतर माहेरीही दुरावा निर्माण झाला. काही दिवस बोरी नदीच्या काठावर महादेव मंदिरालगत वाळूच्या ढिगाऱ्यावर इंदूबाईनी मुलीसह आपले बस्तान मांडले
पत्र्यावर भाकरी थापायची. पोटाला मुलीला बांधून खेड्यावर जाऊन गवत कापून आणायचे आणि शहरात चारा विकायचा, असा इंदूबाईंचा दिनक्रम सुरू होता. कष्टाच्या पैशांवर नगरपालिकेच्या योजनेत इंदूबाईनी घरकुल घेतले. जुन्या हातगाडीवर भाजीपाला विक्री सुरू केली. हीच आयुष्यातील प्रगती. जीवनातील दुःख मुलीच्या वाट्याला यायला नको म्हणून तिला घडवले, शिकवले. पुढे इंदूबाईंना आजाराने घेरले. शीतलने मग स्वतः सेतू केंद्रावर काम शोधले दिवसभर काम करून रात्री अभ्यास करायची.
एम. कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यावर शीतलने स्वतः जळगावहून स्पर्धा परीक्षेची पुस्तके मागवली कोणताच क्लास नाही की शिकवणी नाही. कोणाचे मार्गदर्शन नाही. मनात जिद्द आणि उराशी असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शीतलने अभ्यास केला आणि फौजदार पदाची परीक्षा उत्तीण झाली. शीतल पीएसआय परीक्षेत एसटी प्रवर्गातून महिला गटातून राज्यात चौथी आली आहे