कृषी कन्या तेजस्विनी आहेरची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी !
शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी उच्च पदावर असण्याची स्वप्ने बघते…नुसते स्वप्न बघत नाहीतर ते पूर्णपणे करण्यासाठी अहोरात्र मेहनत करते आणि प्रशासकीय सेवेत गुणवत्ता यादीत येते…हा प्रवास अनेक तरूणांना दिशा देणारा आहे. यात तेजस्विनीला कुटुंबाची मोठी साथ मिळाली. त्यामुळे अभ्यास करणे आणि त्यासाठी मेहनत करणे शक्य झाले आहे.
तिची आई जयश्री व वडील प्रफुल्ल आहेर हे शेती करतात तर काका सुनील आहेर व काकू माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन आहेर हे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत.
असा तेजस्विनीच्या कुटुंबात राजकारणाचा वारसा असला तरी आपण प्रशासनात सेवेत करिअर करायचे ध्येय तिने लहानपणापासूनच निश्चित केले होते.
तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिचे देवळा येथे झाले. बारावीनंतर तिने सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनिअरिंगची मेकॅनिकल पदवी मिळवत २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
पहिल्या प्रयत्नात मला अवघ्या ७ गुणांनी अपयश आले तरी न खचता तिने अभ्यासात सातत्य ठेवला.या अभ्यासात टेक्नॉलॉजीचा योग्य पद्धतीने वापर केला. त्यामुळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा २०२१ च्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात ती इतर मागासवर्ग संवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिचे नाव १०३ क्रमांकावर आहे.