MPSC Success Story : आपल्या स्वप्नांची पूर्तता आपल्यालाच करावी लागते. हेच वैष्णवी बावस्करने दाखवून दिले आहे.वनविभाग, तलाठी आणि नगरपरिषद अशा तीन ठिकाणी निवड झाली होती. पुढे संयुक्त परीक्षा आणि एमपीएससीतही यश मिळवले. त्यामुळे कुठलीच परीक्षा कमी नसून प्रत्येकातून नवीन काहीतरी शिकता येते. तिचे उपजिल्हाधिकारी पद मिळवावे हे स्वप्न होते. ते तिने पूर्ण करून दाखवले. तिचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता.
२०१९ ला वडिलांचे निधन झाले. हक्काचा आधार गेल्याने आर्थिक परिस्थिती बेताची झाली. पण आई रुग्णालयात नोकरीला होती. तिच्या आईने कायम साथ दिल्याने एमपीएससीत यश मिळवता आले.
तिचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या तर माध्यमिक शिक्षण केशवनगर शाळेत झाले. सुरुवातीला डॉक्टर बनायची खूप इच्छा असल्याने बारावीत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. मात्र, ‘नीट’मध्ये चांगले गुण न मिळाल्याने ही संधी हुकली. त्यानंतर फॉरेन्सिक विज्ञान शाखेतून बी.एस्सी. अंतिम वर्षापासून (२०१९) स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कराेना काळात अभ्यासाला चांगली संधी मिळाली.
तिने घरूनच जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. ‘एनसीईआरटी’ आणि राज्य मंडळाची सर्व पुस्तके वारंवार वाचून काढली. सातत्याने अभ्यास करून २०२०, २०२१ आणि २०२२ अशी तीनदा परीक्षा दिली. मुलाखतीपर्यंत गेले, मात्र राज्यसेवा परीक्षेत यश आले नाही. दरम्यान, २०२२ ला संयुक्त परीक्षेतून सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. तरीही २०२३ ची राज्यसेवा परीक्षा दिली. यात यश मिळाले आणि उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली.