वडिलांचे स्वप्न पूर्ण! शीतलची सहाय्यक महसूल पदाला गवसणी!
MPSC Success Story शीतल ही ग्रामीण भागात लहानाची मोठी झालेली लेक. काही वर्षांपूर्वी शितलचे वडील वारले. मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईने सांभाळली. आपली मुलगी शिकली तर घराचे नाव मोठे करेल, स्वावलंबी होईल या विचाराने अतिशय मेहनत करून आई रत्ना भोज यांनी मुलगी शीतल आणि भाऊ प्रदीप यांना शिकविले. शितलने देखील जिद्दीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन लागली. याच मेहनतीच्या जोरावर ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
शितलचे प्राथमिक शिक्षण ओणेवाट जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात, तर बारावीनंतरचे शिक्षण नाशिकच्या के.आर.टी. महाविद्यालयात झाले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ध्येयाने शीतल यांनी जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करताना प्रत्येक पायरीवर अभ्यासाच्या जोरावर यशस्वी होत गेली. खरंतर शासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असताना, अनेकदा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र, जिद्द व आत्मविश्वाच्या बळावर कुठलेही यश अवघड नाही हे तिने दाखवून दिले. तिचे पती देखील प्रशासकीय सेवेत आहेत. लग्नानंतर देखील तिला या परीक्षेसाठी खूप पाठिंबा मिळाला. विशेषत: आई आणि भाऊ यांनी तिला पूर्णपणे पाठबळ दिले. म्हणूनच, तिला हे यश संपादन झाले आहे.