आपल्या परिस्थितीचा गवगवा न करता. यातून मार्ग काढत जिद्दीने अभ्यास केला तर यश मिळतेच याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे ऋषिकेश सोनावणे. ऋषिकेशची घरची परिस्थिती ही बेताची होती. आपली उपजीविका करण्यासाठी तो पार्ट टाइम जॉब करून जेवणाचा खर्च भागवायचा. इतकेच नाहीतर वडिलांना सकाळ – संध्याकाळी वेळ मिळेल तसं इस्त्री कामात मदत करायचा. काम आणि अभ्यास सांभाळत त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. दररोज पहाटे लवकर उठून तो अभ्यासिकेत अभ्यास करायचा. नंतर मैदानी सराव देखील करायचा. गावात सोयीसुविधा नव्हती. पण याच दरम्यान वाकोज येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास योग्य पद्धतीने करता यावा, यासाठी आचार्य गजाननराव गरुड स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच गौराई स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु झाले. या दोन्ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरल्या आहेत. तिकडेच तो अभ्यास करत असे.
ऋषिकेश सोनवणे हे व्यवसायाने धोबी आहेत. सुमारे तीन पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय आहे. यात वडिलांना मदत म्हणून ऋषिकेश देखील सकाळ, संध्याकाळ अभ्यासातून वेळ मिळेल तसा कपड्यांना इस्त्री करायचा. या दरम्याने त्याने सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न देखील सुरुच ठेवले होते. यातून त्याची महाराष्ट्र दारूबंदी पोलिस खात्यात निवड झाली आहे. स्वतः जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.