सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांची आर्मीत लेफ्टनंटपदी गगनभरारी!
जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील लेक देशसेवेसाठी पुढे सरसावतो. तेव्हा त्याचा प्रवास जगण्यासाठी अधिक बळ देतो.असाच, शहरातील मिल परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातून लेफ्टनंटपदाला गवसणी घालणाऱ्या राजशेखर जाधव याची आर्मीत लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.
लहानपणापासून त्याने देशसेवेचे स्वप्न बघितले होते. त्या मार्गाने जाण्यासाठी त्याला घराने देखील नेहमीच पाठिंबा दिला. राजशेखरचे वडील सुरेश जाधव रिक्षाचालक, तर आई कमलबाई जाधव या जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवारत आहेत.
सामान्य घरात जडणघडण झाली असली तरी त्याने कायम देशासाठी लढायचे ठरवले होते.राजशेखरचे प्राथमिक शिक्षण शहरातील कनोसा कॉन्व्हेंटमध्ये झाले. नंतर अकरावी व बारावीचे शिक्षण त्याने सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (औरंगाबाद) येथे पूर्ण केले.शिक्षण घेतानाच त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय सुरक्षा ॲकॅडमीसाठी निवड झाली.
खडकवासला (पुणे) येथील प्रबोधिनीमध्ये तीन वर्षांचे कसरतीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्याची लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली. पुढे, राष्ट्रीय सुरक्षा ॲकॅडमीची (एनडीए) परीक्षा आणि अवघड प्रशिक्षण पूर्ण करून आर्मीत लेफ्टनंटपद मिळविणाऱ्या राजशेखर सुरेश जाधव या तरुण अधिकाऱ्याची तवांग (अरुणाचल प्रदेश) येथे नियुक्ती झाली आहे.