शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्धीस अखेर सोमवारी (दि. ५) मुहूर्त मिळाला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमधील २१ हजार ६७८ रिक्त जागांवर शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या एक वर्षापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी आठ हजार प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत.
पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या १२ हजार ५२२, राज्यातील १८ महापालिकेच्या २ हजार ९५१, ८२ नगरपालिका आणि परिषदेच्या ४७७ तसेच १ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांच्या ५ हजार ७२८ अशा एकूण २१ हजार ६७८ शिक्षकांची रिक्त पदांवर भरती होणार आहे. १६ हजार ७९९ पदे मुलाखतींशिवाय तसेच ४ हजार ८७९ पदे मुलाखत घेऊन भरण्यात येणार
आहेत.
माध्यमनिहाय मराठी १८ हजार ३७३, इंग्रजी १९३१, उर्दू-१८ १८५०, हिंदी ४१०, गुजराथी १२, कन्नड ८८, तामिळ ८, बंगाली ४, तेलुगू -२ याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येतील, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
असा करा प्राधान्यक्रम जनरेट उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल दिले आहे. तसेच,उमेदवारांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecrui tment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे आदींबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर संपर्क करावा.