⁠
Jobs

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची महाभरती ; कोणत्या माध्यमासाठी किती पदे?

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार असून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी तब्बल १३४२ पदे भरण्यात येणार आहेत.शिक्षण विभागाने या पदभरतीची जाहिरात दिली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंतही ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळांतील पटसंख्या वाढली असताना शिक्षकांची पदे मात्र मागील काही वर्षापासून रिक्त आहेत.

ही पदे भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून यासाठी जाहिरात काढण्य़ात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान पदभरतीत पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे. परंतु, या भरतीमुळे कायमस्वरूपी शिक्षक मिळतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने आता याकरीता जाहिरात दिली आहे. पात्र उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण विभागातील अधिका-याने सांगितले.

माध्यम आणि पदे
इंग्रजी – ६९८
हिंदी – २३९
मराठी – २१६
उर्दू – १८९

Related Articles

Back to top button