⁠
Inspirational

परिवार आणि स्वप्न, सलग १८ वर्ष ठेवला संयम; अखेर ‘वर्दी’चं स्वप्न केलं पूर्ण

तारेवरची कसरत करून परिवार आणि स्वप्न या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे अप्रूपच! आणि हे अप्रूप सत्यात उतरवते एक स्त्री! अठरा वर्षे एक स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्द आणि चिकाटीनं प्रयत्न करणाऱ्या सविता रणजित शिंदे (बोरगाव) यांनी अखेर आपलं ‘वर्दी’चं स्वप्न पूर्ण केलं.

ध्येय साध्य करण्यासाठी माणूस कितीही काळ अथक परिश्रम करू शकतो, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. इयत्ता दहावीत असताना इंग्रजी विषय राहिल्याने नापास झालेल्या सविता यांनी सुरक्षा अधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेत राज्य पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. दोन मोठ्या मुलांची आई आणि शेतकरी नवऱ्याची पत्नी आता ‘महाजनको’ येथे सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळणार आहे.

सविता शिंदे यांचं माहेर आणि सासर बोरगाव. १२ वी शिक्षण झाल्यानंतर सन २००५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना दोन मुले आहेत. मोठा पृथ्वीराज नवोदयला शिकून आता इचलकरंजी येथे जेईईची तयारी करतोय, तर छोटा यशराज सध्या पेठेत शिकतोय. दहावीत आलेल्या अपयशानंतर सविता यांच्या मावशी-काकांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले. किमान पदवीचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पदव्युत्तरला प्रवेश घेतला, पण ते अपूर्ण राहिले. पती रणजित यांना शिकण्याची इच्छा असूनही शिकता न आल्याने जिद्दी पत्नीला मात्र त्यांनी शैक्षणिक सपोर्ट दिला.

सुरवातीला सुनील सत्रे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा मार्ग दाखवला. नंतर अभिजित शिंदे यांनी आणि त्यानंतर महाराष्ट्र अॅकॅडेमीच्या अस्लम सुतार-शिकलगार यांनी त्यांना या प्रवासात मार्गदर्शन केले. पदवीनंतर पीएसआय होण्याची मनीषा बाळगून सविता प्रयत्नशील होत्या. घरची जबाबदारी, संसार-मुले यांचा सांभाळ करत, प्रसंगी शेतीत मदत आणि जनावरांची निगा या सर्वांना तोंड देत सविता यांनी हे यश मिळवले आहे.

इतरांप्रमाणे त्यांनाही ‘वर्दी’चेच आकर्षण होते. परंतु, सुरक्षा अधिकाऱ्यांनाही तसाच सन्मान, दर्जा आहे हे जाणल्यानंतर त्यांनी या पदासाठी तयारी केली. आर्थिक मागासवर्गीय (EWS) गटातून त्यांनी अर्ज भरला. राज्यातून हजारो विद्यार्थी होते. महिलांसाठी एकच जागा होती. खुल्या गटातून राज्यात दुसऱ्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि अखेर त्यांचे वर्दीचे स्वप्न साकार झाले.

“वर्दी मिळवण्याच्या प्रवासात अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. यात अनेक चांगले मार्गदर्शक भेटले. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक प्रयत्न करावे लागत असले तरी सपोर्ट सिस्टीम महत्त्वाची असते. मला ती पती-कुटुंब आणि शिक्षकांनी दिली. स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना शेवटपर्यंत आशावाद जिवंत ठेवावा लागतो. यश हमखास मिळते.”
-सविता शिंदे, बोरगाव.

Related Articles

Back to top button