Success Story परभणी जिल्ह्यातील कृष्णा, आकार आणि ओंकार शिसोदे यांच्या या यशाने बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलांनाही प्रेरणा मिळत आहे. कृष्णा आणि आकार यांची मुंबई पोलिस आणि ओंकार याची परभणी पोलिस दलात निवड झाली आहे. लहानपणापासून परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा, दैनंदिन जीवनातील खर्च कसा भागवायचा? हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. पण मेहनत, हुशारीने आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जाताना मुलांनी मिळेल ते काम करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिसोदे भावंडांनी स्वतः स्वतःचा मार्ग शोधला. या हुशार मुलांना महिला बालविकास विभागानेही मदत केली.या प्रवासात त्यांना महिला बालविकास विभागाने बरीच साथ दिली.
शिसोदे कुटूंब हे मूळचे परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी गावाचे येत. या मुलांच्या आई-वडिलांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आणि ही मुले बालपणीच अनाथ झाली. हाताशी काही आर्थिक सुबत्ता नाही की जीवनाची वाट नाही….पदरी जेमतेम एक एकर जमीन आणि घर. अत्यंत हालाखीचे परिस्थिती होती. यात, आई – वडिलांचे छत्र पण हरपले. या तिघांतील सर्वांत मोठ्या भावाने आकाशने भावांची जबाबदारी उचलली. भावंडांसाठी आकाशने शिक्षण सोडले आणि साखर कारखान्यावर काम सुरू केले. पण भावांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. म्हणून लहाने कृष्णा, आकार आणि ओंकार परभणी जिल्ह्यातीलच सागर बालगृहात राहायचे. सन २०१५ मध्ये बालगृह बंद झाले. त्यानंतर या मुलांना परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संस्थेत आश्रय मिळाला. संस्थेचे नितीन लोहट यांनी त्यांना मदत केली. नंतर कृष्णा मित्रांच्या खोलीवर राहायचा.
या सगळ्या काळात नोकरी मिळायला हवी. अशा परिस्थितीत कायम राहून चालणार नाही. हा विचार मनाशी पक्का करून तिघांनी सरकारी नोकरीचा ध्यास घेतला. त्यानंतर तिघांनाही पुण्याच्या आफ्टर केअर होममध्ये प्रवेश मिळाला. पुण्यात गेल्यानंतर मुलांनी शिक्षण सुरू ठेवले. आकार कॉल सेंटरवर आणि कृष्णा, ओंकारही जॉब करायचे. आकारने अकरावीपासूनच पोलिस भरतीसाठी तयारी सुरू केली होती. त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. ओंकारही शेवटच्या वर्षाला आहे. कृष्णाने बी. कॉम केले. सन २०१८मध्ये अनाथ आरक्षण लागू झाले. तेव्हाचे परिविक्षा अधिकारी शेख, अनाथ आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारा पहिला अनाथ उमेदवार ठरलेला नारायण इंगळे यांनीही या मुलांना मदत केली.
पुण्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कांबळे यांनी शिफारस केल्यावर पुणे विभागीय कार्यालयाने तिघांना अनाथ प्रमाणपत्र दिले. तिघेही आता इतर अनाथ मुलांना मार्गदर्शन करीत आहेत. आफ्टर केअर होममध्ये असतानाच अनाथ प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि मिळेल ते काम करून स्वतःची बचत करायला हवी. परिस्थिती कशीही असली तरीही अभ्यास करायलाच हवा. अनाथपणा आला असला तरी जगण्याच्या प्रत्येक पायरीवर यश मिळवण्याची धडपड करायला हवी. या तिघांनी नुसती धडपड केली नाहीतर पोलिस दलात दाखल होऊन नवा आदर्श निर्माण केला.
यापुढे त्यांना अनाथ मुलांसाठी सामाजिक काम करायचे आहे. मेहनतीने पुढे गेलो तर यश मिळतेच. यामुळे हे तिघे यशस्वी झाले.