आपला अभ्यास, संघर्ष हा देशासाठी असला पाहिजे या उद्देशाने चांदवडची लेक देशसेवेसाठी पुढे आली.
चांदवड तालुक्यातील सोनीसांगवीच्या सर्वसामान्य कुटुंबातील श्रेया ठाकरेने शालेय जीवनात देशसेवेसाठी नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आता सत्यात उतरले आहे. भारतीय नौदलात एअर इंजिनिअर म्हणून भरती झाली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेत झाले. तिचे आजोबा रामचंद्र ठाकरे हे मराठा प्रसारक समाज संस्थेचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे श्रेयाला मार्गदर्शन लाभले. वडील दिलीप ठाकरे हे खासगी कंपनीत आहेत. आई ‘मविप्र’मध्ये शिक्षिका आहेत. तिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. विविध प्रकारच्या नोट्स काढणे, प्रश्नपत्रिका सोडवणे हा नित्यक्रम चालू होता.
लेखी परीक्षेसोबत ती शारीरिक परीक्षेत देखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. निवड यादीत आपले नाव पाहिल्यावर तिचा आनंद गगनात मावत नव्हता.श्रेयाची नेमणूक केरळमधील कोची येथे झाली आहे. ओडिशामधील नौदलाच्या आय. एन. एस. चिल्का येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत ती कार्यरत झाली आहे.देशासाठी काहीतरी करायचे असा निश्चय करीत नियोजन, सातत्य, संयम आणि संघर्षाला जिद्दीसह चिकाटीची जोड हा संपूर्ण तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असणार आहे.