पुणे : क्लास वन अधिकारी होण्यासाठी विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत असतात. रात्रंदिवस अभ्यासात गुंतलेले असतात. MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दरवषी हजारो पदांसाठी भरती निघत असते. अशातच काही दिवसांपूर्वीच MPSC मार्फत 2023 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक घोषित केले. त्यात गट-ब व गट-क या पदांसाठी होणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेबाबत माहिती दिली आहे.
मात्र या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा, अशी मागणी MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या या परीक्षेचा अभ्यासक्रम लवकर जाहीर झाला, तरच विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळेल, अशी भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आली आहे.
‘MPSC’मार्फत होणाऱ्या २०२३ मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक २८ सप्टेंबरला घोषित करण्यात आले. त्यात गट-ब व गट-क या पदांसाठी होणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेबाबत माहिती दिली आहे. यातील पूर्वपरीक्षा एप्रिल-२०२३मध्ये होणार असल्याचे ‘एमपीएससी’कडून सांगण्यात आले. येत्या जानेवारी महिन्यात त्याच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. एव्हाना आयोगाकडून या परीक्षांसाठीचा नियोजित अभ्यासक्रम जाहीर करणे अपेक्षित आहे; परंतु अद्याप अभ्यासक्रम घोषित न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अभ्यासासाठी पूरक वेळ मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
पुन्हा तीन सदस्यांवर कारभार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सद्यस्थितीत चार सदस्य आहेत. यातील एक सदस्य ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. यामुळे पुन्हा एकदा ‘एमपीएससी’चा गाडा तीन सदस्यांनाच हाकावा लागणार आहे. यामुळे उर्वरित तीन सदस्यांची नेमणूक सरकारने तातडीने करावी, अशा मागणीचे पत्रही विद्यार्थी संघटनांकडून सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा ०४ जून २०२३ या दिवशी तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० संवर्गासाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल तर ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षा पार पडेल.