मेंढपाळाचा पोरगा झाला फौजदार! वाचा तरुणाची प्रेरणादायी कहाणी
“घरात पहिलाच जवान शाळा शिकला अन् मेंढ्या वळूनसन फौजदार झाला”…हे मेंढपाळ वडिलांच्या तोंडचे वाक्य जीवनाचे सार सांगून जाते.समाजात अजूनही शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी हा राजेंद्रचा आशादायक आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ह्या छोट्याशा गावातील राजेंद्र भीमाजी कोळेकर.धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील राजेंद्रने कला शाखेतून राज्यशास्त्राचे पदवीपर्यंतच शिक्षण घेतले.
घरी कोणीच शिकलेले नाही की कोणतीच पदवी नाही, कसलीच पार्श्वभूमी नाही पण हे किती दिवस चालणार? कधी ना कधी शिक्षणाची कास धरायला हवी.याच विचाराने राजेंद्रने पण शिक्षणाची वाट धरली.घरातून शाळेत जाणारा, पदवीपर्यंत शिक्षण घेणारा राजेंद्र हा पहिलाच मुलगा. त्यातही मेंढ्या वळणं सुटलेले नाही.
अगदी आत्तापर्यंत…हे सारं करताना राजेंद्रला देखील मेंढ्या पाळण्यासाठी त्या आधारित कामे करण्यासाठी अजूनही शेतात, रानात जावे लागत असे. हे सांभाळत राजेंद्र याने ढवळपुरीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नाशिकला अकादमीमध्ये प्रशिक्षणाला येईपर्यंत राजेंद्र ढवळपुरीत मेंढ्या वळत होता.शेतात दिवसभर कष्टाचेच काम असल्याने शरीर काटक होतेच. त्यामुळे मैदानाचा सराव चांगलाच झाला. अभ्यासाची तयारी करण्यासाठी अहमदनगरला जायचा. अभ्यासात एकाग्रता आणि मैदानात असणारी तेजोमयता यामुळेच २०१९ मध्ये पहिल्याच परीक्षेमध्ये राजेंद्र याने यशाला गवसणी घातली आणि फौजदार झाला.