⁠  ⁠

गडचिरोली जिल्ह्यातील लेकीची कमाल ; वैद्यकीय क्षेत्रातील गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

गडचिरोली हा मागास भाग म्हणून समजला जातो. या भागात तसे बघितले तर अजूनही अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. त्यामुळे कित्येकांचे शिक्षण अपूर्ण राहते. चामोर्शी येथील भाग्यश्री दुम्पट्टीवार या विद्यार्थिनीनेही कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर दोन पदकांसह एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करून डॉक्टर बनली आहे.

भाग्यश्रीचे वडील दिव्यांग असून चामोर्शी येथे त्यांचा फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय आहे. तर तिची आई गृहिणी आहे. भाग्यश्रीचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कारमेल ॲकॅडमी चामोर्शी येथे झाले. अतिदुर्गम आणि मागास समजल्या जाणाऱ्या भागात मुलींना शिक्षण देणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. भाग्यश्रीने बायोकेमेस्ट्री आणि मायक्रोबॉयोलॉजी या दोन विषयांत प्राविण्य श्रेणी मिळवित दोन पदके प्राप्त केली आहेत.

भाग्यश्रीने आपले ध्येय ठरवून त्यादृष्टीने सातत्यपूर्ण अभ्यास करीत वैद्यकीय शिक्षणाकरिता आवश्यक पूर्व परीक्षांची तयारी करून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला.ती नागपूर येथील एनकेपी साळवे कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सची २०१८ च्या बॅचमधील विद्यार्थिनी आहे.तसेच तिचा मोठा भाऊ डॉ. शुभम दुम्पट्टीवार याने नुकतेच एमबीबीएस पूर्ण केले असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता तयारी करीत आहे.

त्याचेही तिला मार्गदर्शन लाभले.विशेष म्हणजे, तिने लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथून इंटर्रनशीप पूर्ण केली आहे.‌ती बालपणापासून अभ्यासात हुशार होती. तिला आवश्यक ते पोषक शैक्षणिक वातावरण मिळाल्यामुळे तिने अजून गगनभरारी घेतली.

Share This Article