खडतर परिस्थितीत देखील मिळवले घवघवीत यश ; प्रमोदची वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड !
Success Story : आपल्या मुलाने शिकावं आणि पुढे मोठे व्हावे ही प्रमोदच्या आई – वडिलांची इच्छा होती. प्रमोद सटाले यांच्या वडीलांकडे दहा एकर शेती होती. पण, मुलांच्या शिक्षणासाठी ७ एकर जमीन विकावी लागली. प्रमोदला दोघे भाऊ असून, एक वकील तर एक राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे.
आता प्रमोदची वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे. प्रमोदची जडणघडण ही पूर्णतः अत्यंत खडतर परिस्थितीत आणि तडोळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात गेली. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावच्या शाळेत गेले.तर माध्यमिक शिक्षण हे पायी चालत जाऊन मांडखेलच्या आसूबाई विद्यालयात झाले.
अशा परिस्थितीत मोठ्या जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढे काळेवाडी (रेणापूर) येथे मामाच्या घरी राहून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांना हातभार लागावा, म्हणून लवकर नोकरी मिळावी, यासाठी एमआयटी लातूरमधून बीबीए पूर्ण केले.स्वतःचे वेगळेपण सिद्ध करायचे असल्याने स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा २०१२ पासून एक प्रवास सुरू केला. मधल्या काळात आपल्या तीन मुलांना एकाच वेळी शिकविताना शेतकरी बापाने मुलांची स्वप्नं परिस्थितीमुळे अर्धवट राहू नये, म्हणून काही जमीन विकली.
ज्युनिअर ऑडिटर म्हणून नोकरी लागली. कालांतराने नोकरीचा राजीनामा देत नंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. या परिस्थितीत देखील त्याने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ठरवले आणि अहोरात्र मेहनत करून २०१४-१५ मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षा पास झाले.