आदिवासी समाजातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार ; मयूरची ‘सायंटिस्ट बी’ पदासाठी निवड !
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्या उराशी जिद्द ठेवणे गरजेचे असते. आदिवासी समाजातील ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मयूर हा मुलगा.अभ्यासाचे सुनियोजन करून मयूर गवारीची संरक्षण क्षेत्रातील संशोधन संस्था डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, पुणे (डीआरडीओ) संस्थेत ‘सायंटिस्ट बी’ पदासाठी निवड झाली आहे. आदिवासी समाजावर लेखन करणाऱ्या वडिलांच्या साहित्यामुळे त्याला सामाजिक जाणीव झाली. म्हणून वंचित आदिवासी समाजाचे आपण देणे आहोत, याची जाणीव आहे. तो घरात अभियंता होणारा पहिलाच असून, कठोर परिश्रमाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला यश आले आहे.
मयूरचे प्राथमिक शिक्षण जेलरोडच्या आदर्श प्राथमिक शाळा व नाशिकरोडचे पुरुषोत्तम शाळा आणि माध्यमिक शिक्षण मखमलाबाद येथील छत्रपती विद्यालयातून झाले. मराठीतून शिक्षण घेत त्याने दहावीत तब्बल ९५ टक्के गुण मिळविले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून घेताना अभियांत्रिकी (बीई) शिक्षण मविप्र संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतले. पुढे एम. टेक शिक्षण पुण्यातील ‘सीओपी’तून घेतले.मयूरने बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच आपले ईप्सित निश्चित केले होते.
प्रचंड अभ्यासास सुरवात केली. विशेष म्हणजे त्याने उच्च माध्यमिक ते एम. टेक या पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात कधीच शिकवणी लावली नाही.शिक्षण पूर्ण करत पुण्याच्या सुजन कूपर प्रा. लि. कंपनीत २०१८ ते २०२० अशी दोन वर्षे मेकॅनिकल इंजिनिअरपदावर काम केले.घरी राहून दोन वर्षे स्पर्धा परीक्षेचे स्वयं अध्ययन सुरू केले. एचपीसीएल कंपनी, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर (मुंबई), इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्च (इस्रो), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (श्रीहरी कोटा) अशा विविध संस्थांच्या परीक्षेत यश संपादन केले.