आपण केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. आपल्या प्रयत्नांना कधी ना कधी यश मिळतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगरमधील अमोल आग्रे.म्हैसगावच्या मुळा थडीत वसलेल्या डोंगराळ भागातील आग्रेवाडी या गावातील भास्कर आग्रे यांचा मुलगा.
अमोलची घरची परिस्थिती ही बेताची होती.पण त्याची जिद्द ही लाखमोलाची होती. त्याचे वडील शेती करत असल्याने संपूर्ण कुटूंब हे शेतीवर अवलंबून होते. तर आई गृहिणी. असे असले तरी अमोलच्या आई-वडिलांनी उच्च शिक्षण देण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला.
त्याचे अमोलचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आग्रेवाडी नंतर इयत्ता १० वीचे श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथे झाले. १२ वीचे शिक्षण वरवंडी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात तर पदवीधरचे शिक्षण वायसीएममधून सह्याद्री कॉलेज संगमनेर येथे झाले. या महाविद्यालयीन जीवनात त्याला वर्दी विषयी अधिक आकर्षण वाटू लागले. त्यामुळे त्याने मैदानी सरावाची सुरूवात केली. या मैदानी सरावासोबत अभ्यास देखील केला.
आपण प्रयत्न केला तर पोलीस नक्कीच बनू. या विश्वास उराशी बाळगून त्याने अहोरात्र मेहनत घेतली.अमोलच्या याच मेहनतीवर त्याने पोलीस भरतीचे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल होण्याचा बहुमान मिळविला आहे. अमोल याने मिराभाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कॉन्स्टेबल पदाला गवसणी घातली आहे.