आई-वडिलांच्या निधनानंतर तिन्ही भावंडे पोरकी झाली, अथक परिश्रमानंतर राहुलची तीन सरकारी पदांवर निवड
आपल्या कठीण परिस्थितीतून मात करत यश मिळवले की अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास ठरतो.घरोघरी वृत्तपत्रवाटप करून, भाजीपाला विकून रोजंदारीने कापसाच्या गाड्या भरून वीतभर पोटासाठी भटकंती करून राहुल रवींद्र सूर्यवंशी याने प्रतिकूल परिस्थितीवर उदरनिर्वाह करून शाळा शिकू लागले.इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर झाला आहे. दोन वर्षांचा असतानाच वडील वारले. कालांतराने तो १४ वर्षांचा असताना आईनेही जग सोडले.
मोठी बहीण अश्विनी, भाऊ रूपेश व तो अशा तीनच व्यक्ती कुटुंबात राहिल्या. तिन्ही भावंडे पोरकी झाली. परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नातेवाईकही संपर्क करीत नव्हते. सकाळी व सायंकाळी घरात चूल कशी पेटेल याची भ्रांत तिघांना वाटत असे. राहुलने जमेल तेवढं काम करून उदरनिर्वाह सुरू केला.
राहुलने गावातीलच सी. एस. बाफना हायस्कूलमध्ये शिक्षण घेत दहावीला चांगले मार्क्स मिळवून धुळे येथे गव्हर्न्मेंट डिम्लोमा करून जळगाव येथे इंजिनिअरिंग पूर्ण केले. खासगी कंपनीत जॉब करून एम.टेक.पर्यंत शिक्षण घेतले. मग स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्या मेहनतीतून राहुल सूर्यवंशी याचे चार महिन्यांत हे तिसरे सिलेक्शन आहे. पहिले सिलेक्शन बीएमसी (मुंबई) येथे, दुसरे सिलेक्शन मुंबई पोलिस, तिसरे सिलेक्शन सहाय्यक अभियंता (क्लास-२)पदी निवड झाली.